नवी दिल्ली : येत्या २६ जानेवारी रोजी संपूर्ण देश आपला ७७ वा प्रजासत्ताक दिन अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे. नवी दिल्लीतील ऐतिहासिक 'कर्तव्य पथ'वर या निमित्ताने भारताचे लष्करी सामर्थ्य आणि सांस्कृतिक वैविध्याचे दर्शन घडवणारी भव्य परेड आयोजित करण्यात आली आहे. यंदाचा सोहळा विशेष ऐतिहासिक ठरण्याचे कारण म्हणजे, राष्ट्रगान 'वंदे मातरम्'ला पूर्ण होणारी १५० वर्षे; ज्याचे औचित्य साधून विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाची संकल्पना भारताची 'एकता, विविधता आणि प्रगती' या त्रिसूत्रीवर आधारित आहे. स्वातंत्र्याच्या अमृत काळानंतर विकसित भारताकडे पडणाऱ्या पावलांचे प्रतिबिंब कर्तव्य पथावरील चित्ररथांमध्ये पाहायला मिळणार आहे. 'वंदे मातरम्'च्या दीडशे वर्षांच्या गौरवशाली प्रवासाचे स्मरण करत देशाच्या बलिदानाचा आणि क्रांतीचा इतिहास पुन्हा एकदा जिवंत केला जाणार आहे.
मुंबई : दक्षिण मुंबईतील महालक्ष्मी रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक सुलभ करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे उभारण्यात येत असलेला केबल-आधारित (Cable-Stated) ...
कर्तव्य पथावर रंगणार भव्य सोहळा
प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये तिन्ही सैन्य दलांचे संचलन, चित्तथरारक कसरती आणि विविध राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे चित्ररथ हे आकर्षणाचे केंद्र असतील. भारताने तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रात केलेल्या प्रगतीचे दर्शन या माध्यमातून जगाला घडवले जाणार आहे. संपूर्ण दिल्लीत सध्या कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून, २६ जानेवारीच्या या दिमाखदार सोहळ्याकडे जगाचे लक्ष लागले आहे.
'वंदे मातरम्'च्या जयघोषात गुंजणार कर्तव्य पथ
यंदाच्या २६ जानेवारीच्या सोहळ्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर मैत्रीचा नवा हात पुढे केला आहे. ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे 'मुख्य अतिथी' म्हणून युरोपियन युनियनचे दोन शक्तिशाली नेते उपस्थित राहणार आहेत. युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष एंटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन यांच्या उपस्थितीत यंदाचा सोहळा रंगणार आहे. प्रजासत्ताक दिन परेड सकाळी ९:३० वाजता राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण होईल. ध्वजारोहणानंतर 'वंदे मातरम्' गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त विशेष मानवंदना दिली जाईल. त्यानंतर १०.३० वाजता कर्तव्य पथावर मुख्य परेड सुरु होईल जी जवळपास दीड ते दोन तास चालेल.
भव्य परेड आणि विविध राज्यांचे चित्ररथ
यंदा कर्तव्यपथावर एकूण ३० विविध चित्ररथ पाहायला मिळतील. त्या माध्यमातून वेगवेगळ्या राज्यांची संस्कृती आपल्याला दिसेल. प्रत्येक चित्ररथाचं विषय “स्वतंत्रता का मंत्र : वंदे मातरम्” आणि “समृद्धि का मंत्र : आत्मनिर्भर भारत” असल्यामुळे भारताच्या इतिहासापासून आधुनिक प्रगतीपर्यंतचा प्रवास रंगून दिसेल. ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) थीमवर आधारित चित्ररथ यंदा विशेष आकर्षण ठरेल, ज्यात भारतीय सैन्याची सामर्थ्य, राफेल आणि अन्य लढाऊ विमानांचे प्रतिनिधीत्व झळकताना दिसेल. विविध राज्यांची चित्ररथ त्यांच्या सांस्कृतिक वारसा, आर्थिक उत्कर्ष, पर्यटन व नवोन्मेष यांचे सान्निध्य दाखवतील.
लष्कराचे प्रात्यक्षिके आणि विमान प्रदर्शने
सैन्य शक्तीचा अभिमान दाखवण्यासाठी भारतीय लष्कर, वायुसेना आणि नौदल आपल्या सर्वोत्तम क्षमतेसह सहभागी होतील. या वर्षी विशेषतः वायुसेनेचे ‘सिंदूर’ फॉर्मेशन फ्लायपास्ट, ज्यात राफेल, सुखोई-३०, मिग-२९ असे लढाऊ विमान दिसतील. ते भारताचे सामर्थ्य दर्शवतील.
२,५०० कलाकारांचा महासोहळा आणि सुरक्षेचा अभेद्य वेढा
यंदाच्या परेडमध्ये भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवण्यासाठी सुमारे २,५०० कलाकार सज्ज झाले आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले हे कलाकार आपली पारंपरिक लोककला, संगीत आणि नृत्याविष्कार कर्तव्य पथावर सादर करतील. विविध राज्यांचे चित्ररथ आणि कलाकारांचे हे सादरीकरण म्हणजे जगासमोर भारताची 'विविधतेत एकता' सिद्ध करणारा एक अविस्मरणीय सोहळा ठरणार आहे. पारंपरिक लोकनृत्य आणि संगीताच्या माध्यमातून भारताची संस्कृती एकाच रांगेत जगासमोर सादर केली जाईल. या भव्य सोहळ्यासाठी दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. संपूर्ण कर्तव्य पथ आणि आजूबाजूचा परिसर सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली असून, एकत्रित देखरेख केंद्राद्वारे प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे. परदेशी पाहुणे आणि उपस्थितांच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षा दलांचा अभेद्य वेढा घालण्यात आला आहे.