बुलढाणा : महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात एसटी बसचा अपघात थोडक्यात टळला. चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे बसमध्ये असलेल्या ३० जणांचे प्राण वाचले.
वरुड परिसरात धाड–बुलढाणा मार्गावरुन बस पुढे जात होती. वरुड–सोयगाव–जामठी मार्गावर धावणाऱ्या बसचा नेहमीप्रमाणे वेगाने प्रवास सुरू होता. प्रवासी बसमध्ये बसले होते आणि आपापल्या कामात मग्न होते अथवा झोपले होते. अचानक जोराचा आवाज ऐकू आला. सगळ्यांचे लक्ष आवाजाच्या दिशेने वेधले गेले. काही क्षणांतच ब्रेक काम करत नसल्याचं चालकाच्या लक्षात आलं. रस्त्याच्या दुतर्फा वस्ती आणि वर्दळ असल्याने परिस्थिती अधिकच धोकादायक झाली होती.
वेगात असलेली बस थांबवण्यासाठी चालकाने प्रसंगावधान राखून निर्णय घेतला. समोर येणाऱ्या लोकांना किंवा घरांना धडक होऊ नये म्हणून बस एका विद्युत खांबाला धडकवण्यात आली. त्यानंतर बस रस्त्याच्या कडेला जाऊन थांबली.
या घटनेत कोणालाही गंभीर दुखापत झाली नसून एक दुचाकीस्वार थोडक्यात बचावला. बसमधील सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा श्वास घेतला. चालकाच्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.