मोहित सोमण: गेले काही दिवसांत सातत्याने बाजारात घसरण झाली होती. आज मात्र पुन्हा वापसी करत शेअर बाजारात तुफान वाढ झाली आहे. जागतिक सकारात्मकतेचा नवा ट्रिगर मिळाल्याने शेअर बाजारात नवा आशावाद निर्माण झाला. सेन्सेक्स सकाळी ८५० अंकाने व निफ्टी २६२ अंकाने उसळल्याने तेजीची पुन्हा एकदा शाश्वती निर्माण झाली. पुन्हा एकदा जपानच्या निर्यातीत ५.१% घसरण झाली असली तरी युएस अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १ फेब्रुवारीपासून लागू होणारे युरोपवरील नवीन शुल्क आता लादणार नाही असे सांगितल्यानंतर आणि ग्रीनलँडबाबत एका करार टप्यात पोहोचल्याची घोषणा केल्यानंतर प्रमुख अमेरिकन शेअर निर्देशांकांमध्ये नियमित सत्रादरम्यान बाजार बंद होताना मोठी वाढ झाली.
गेल्या काही आठवड्यांपासून ग्रीनलँडवर अमेरिकेचे नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या ट्रम्प यांनी बुधवारी 'ट्रुथ सोशल'वर सांगितले की, त्यांनी आणि नाटोचे सरचिटणीस मार्क रुटे यांनी ग्रीनलँडच्या संदर्भात भविष्यातील कराराची चौकट तयार केली आहे या घोषणेनंतरच थोड्याच वेळात, ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांना त्या आर्क्टिक बेटाबाबत आमच्याकडे एका कराराची संकल्पना आहे असे सांगितले. यापूर्वी अमेरिकेच्या अध्यक्षांनी स्वित्झर्लंडमधील दावोस येथील जागतिक आर्थिक मंचात एका भाषणात सांगितले होते की, ते बळाचा वापर करून ग्रीनलँड ताब्यात घेणार नाहीत, त्यानंतरच शेअर बाजारात वाढ होत होती आता ती पूर्णत्वास गेली.
सकाळच्या सत्रात बँक निर्देशांकात झालेल्या १.२२% वाढीसह व्यापक निर्देशांकात निफ्टी २००, निफ्टी १००, मिडकॅप ५०, मिडकॅप १००, स्मॉलकॅप १०० या निर्देशांकात मोठी वाढ झाली असून निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सर्वाधिक वाढ मेटल, मिडिया, ऑटो, एफएमसीजी, रिअल्टी, मिडस्मॉल आयटी टेलिकॉम निर्देशांकात झाली आहे. काल युएसमधील तिन्ही शेअर बाजारात झालेली वाढ आशियाई बाजारातील कायम राहिली. हेंगसेंग, शांघाई कंपोझिट वगळता इतर सर्व बाजारात वाढ झाली आहे.
सुरुवातीच्या कलात सर्वाधिक वाढ वारी एनर्जीज (९.७४%), अलोक इंडस्ट्रीज (७.२३%), जेके बँक (५.६६%), बँक ऑफ इंडिया (५.६०%), एमआरपीएल (५.३१%), एनसीसी (४.७४%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण पीएनबी हाऊसिंग (५%), आदित्य बिर्ला लाईफस्टाईल (२.८७%), हिंदुस्थान कॉपर (२.२९%), भारती हेक्साकॉम (१.६८%), जेके सिमेंट (१.५५%), स्विगी (१.११%) समभागात झाली आहे.