- जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत दोन जागा बिनविरोध
मुंबई : महानगरपालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्येही भाजपने बिनविरोध विजयाची परंपरा कायम ठेवत आपले खाते उघडले आहे. मंत्री नितेश राणे यांच्या कणकवली–देवगड–वैभववाडी विधानसभा मतदारसंघात पंचायत समितीच्या दोन जागांवर भाजपाच्या उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे पंचायत समिती गणामध्ये भाजपच्या साधना नकाशे यांनी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्यासोबत भाजपाच्या अक्षता डाफळे यांनीही अर्ज दाखल केला होता. मात्र या दोन अर्जांव्यतिरिक्त इतर कोणत्याही उमेदवाराने अर्ज दाखल न केल्याने अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोकिसरे गणामधून भाजपाच्या साधना नकाशे यांची बिनविरोध निवड घोषित केली जाणार आहे.
दरम्यान, कणकवली तालुक्यातील बिडवाडी पंचायत समिती गणामध्येही भाजपच्या उमेदवाराचा विजय बिनविरोध निश्चित झाला आहे. भाजपाच्या उमेदवार संजना राणे यांनी उबाठा गटाच्या उमेदवार विद्या शिंदे यांच्याविरोधात हरकत घेतली होती. २०१४ नंतर तीन अपत्ये झाल्याचा मुद्दा उपस्थित करत करण्यात आलेली ही हरकत ग्राह्य धरत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विद्या शिंदे यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवला. त्यामुळे बिडवाडी गणामधून भाजपाच्या संजना राणे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
........
मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन
दरम्यान, या निकालावर प्रतिक्रिया देताना मंत्री नितेश राणे यांनी कणकवली विधानसभा मतदारसंघातील पंचायत समिती निवडणुकीतील भाजप–महायुतीच्या दोन्ही उमेदवारांचे अभिनंदन केले. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पुढील टप्प्यांकडे सर्वांचे लक्ष लागले असताना, बिनविरोध मिळालेल्या या विजयामुळे भाजपच्या संघटनात्मक ताकदीला बळ मिळाले आहे.