पनवेल: कोकण रेल्वेच्या अनेक गाड्यांचे वेळापत्रक हे विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होताना दिसणार आहे, जवळजवळ महिनाभर हे ब्लॉक जाहीर करण्यात आले आहे.मध्य रेल्वेनं पनवेल ते कळंबोली दरम्यान महिनाभराचा मोठा ब्लॉक जाहीर केला आहे. या ब्लॉकचा परिणाम केवळ मध्य रेल्वेपुरता मर्यादित न राहता, या मार्गावरून धावणाऱ्या कोकण रेल्वेच्या एक्सप्रेस गाड्यांवरही होणार आहे. तुतारी, मांडवी, कोकणकन्या आणि मत्स्यगंधा या चार प्रमुख एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
वेळापत्रक का बदलणार?
पनवेल-कळंबोली रेल्वे स्थानकांदरम्यान ओपन वेब गर्डरची उभारणी करण्यात येणार असून, हे काम डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर (DDFC) अर्थात समर्पित मालवाहतूक मार्ग प्रकल्पाचा भाग आहे. या कामासाठी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात आला असून, हा ब्लॉक १८ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान लागू राहणार आहे. रात्रकालीन ब्लॉकमुळे नियमित लोकल सेवांवर फारसा परिणाम होणार नसला, तरी १६ मेल-एक्सप्रेस गाड्या विलंबाने धावणार आहेत. यामध्ये कोकण रेल्वेच्या गाड्यांचाही समावेश आहे.