तीन राज्यांमध्ये २१ ठिकाणी छापेमारी
नवी दिल्ली : केरळमधील पवित्र सबरीमाला अय्यप्पा मंदिराशी संबंधित सोने चोरी प्रकरण आता एका मोठ्या राजकीय आणि धार्मिक वादात सापडले आहे. मंदिराच्या द्वारपाल आणि इतर पवित्र वास्तूंवर सोन्याच्या मुलामा चढवण्यात अनियमिततेचे आरोप समोर आल्यानंतर अंमलबजावणी संचालनालय (ईडी) या प्रकरणात सक्रिय झाले आहे.
ईडीने मनी लाँड्रिंगच्या दृष्टिकोनातून तपास अधिक तीव्र केला आहे आणि केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकमधील सुमारे २१ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले आहेत. ही कारवाई मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) अंतर्गत केली जात आहे. केरळ पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने यापूर्वी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.
केरळ उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली विशेष तपास पथक (एसआयटी) मंदिरातून सोन्याच्या कथित गैरव्यवहाराची फौजदारी चौकशी करत असताना हे छापे टाकण्यात आले आहेत. आतापर्यंत, एसआयटीने या प्रकरणात १३ जणांना अटक केली आहे, ज्यात मंदिराचे मुख्य पुजारी कंदारारू राजीवारू यांचा समावेश आहे. सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
मुख्य आरोपीच्या जागेवरही छापे टाकण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडी बंगळूरुमध्ये मुख्य आरोपी उन्नीकृष्णन पोटी आणि त्रावणकोर देवस्वोम बोर्ड (टीडीबी)चे माजी अध्यक्षए. पद्मकुमार यांच्याशी संबंधित जागेवरही छापे टाकत आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे केरळ विधानसभेतही मोठा गोंधळ उडाला, ज्यामुळे सरकार, देवस्वोम बोर्ड आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार वादविवाद सुरू झाले.