मुंबई : भारतीय रेल्वेने सर्वसामान्यांच्या प्रवासासाठी सुरू केलेल्या 'अमृत भारत एक्सप्रेस' ताफ्यात आता आणखी ९ नव्या गाड्यांची भर पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केले असून, यामध्ये मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली अलीपुरद्वार-मुंबई (पनवेल) अमृत भारत एक्सप्रेस सामील आहे. या नव्या रेल्वेसेवेमुळे मुंबई आणि उपनगरातील प्रवाशांना थेट पूर्व भारताशी जोडणारा एक परवडणारा आणि वेगवान पर्याय उपलब्ध झाला आहे. अमृत काळाच्या संकल्पनेतून साकारलेली ही 'अमृत भारत एक्सप्रेस' पूर्णपणे नॉन-एसी आणि लांब पल्ल्याची स्लीपर ट्रेन आहे. कमी तिकीट दरात आरामदायी प्रवास व्हावा, या उद्देशाने ही ट्रेन डिझाइन करण्यात आली आहे. विशेषतः कामानिमित्त ये-जा करणारे कामगार, विद्यार्थी आणि सणासुदीला गावी जाणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने हा मोठा निर्णय घेतला आहे. या गाडीत आधुनिक सुविधांचा समावेश असून प्रवाशांचा वेळ आणि पैसे दोन्ही वाचणार आहेत. या नव्या गाडीचा टर्मिनस पनवेल ठेवण्यात आला आहे. पनवेल हे नवी मुंबई, रायगड आणि कोकण भागाचे प्रवेशद्वार असल्याने या परिसरातील नागरिकांना आता लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी दक्षिण मुंबईत जाण्याची गरज भासणार नाही. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) वरील प्रवाशांचा भार कमी होण्यास मदत होईल. तसेच कल्याण आणि ठाणे परिसरातील प्रवाशांसाठीही ही गाडी अत्यंत सोयीची ठरणार आहे. अलीपुरद्वार ही गाडी पश्चिम बंगाल आणि उप-हिमालयीन भागाला जोडते. या नव्या सेवेमुळे पर्यटनासोबतच उत्तर-पूर्व भारताशी असणारे व्यापार आणि रोजगार संबंध अधिक दृढ होणार आहेत. डिसेंबर २०२३ मध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत आतापर्यंत ३० गाड्या धावत होत्या, ज्यात आता ९ नव्या गाड्यांची भर पडल्याने एकूण संख्या ३९ वर पोहोचली आहे.
मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या दहिसर ते मीरा-भाईंदर मेट्रो-९ ...
वेळापत्रक काय आहे?
ट्रेन क्रमांक ११०३१ पनवेल–अलीपुरद्वार अमृत भारत एक्सप्रेस
पनवेलहून सुटणार : दर सोमवारी सकाळी ११:५० वाजता
अलीपुरद्वारला पोहोचणार: बुधवारी दुपारी १:५० वाजता
ट्रेन क्रमांक ११०३२ अलीपुरद्वार–पनवेल अमृत भारत एक्सप्रेस
अलीपुरद्वारहून सुटणार : दर गुरुवारी पहाटे ४:४५ वाजता
पनवेलला पोहोचणार: शनिवारी पहाटे ५:३० वाजता
कसे असतील थांबे?
कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छेओकी, मिर्झापूर, पं. दीन दयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र, सोनपूर, हाजीपूर, मुझफ्फरपूर, समस्तीपूर, कटिहार, न्यू जलपाईगुडी, सिलीगुडी यांसह अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर ही एक्सप्रेस थांबणार आहे.
अवघ्या ५०० रुपयांत १००० किमीचा प्रवास
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, अमृत भारत एक्सप्रेसचे भाडे साधारणपणे ५०० रुपये प्रति १००० किलोमीटर या दराने आकारले जाणार आहे. याचा अर्थ असा की, अतिशय कमी खर्चात प्रवासी देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाऊ शकतील. कमी अंतराच्या प्रवासासाठी देखील याच प्रमाणात माफक दर निश्चित करण्यात आले आहेत. खाजगी वाहने किंवा इतर एक्सप्रेस गाड्यांच्या तुलनेत हे दर अत्यंत कमी असल्याने सर्वसामान्य आणि स्थलांतरित कामगारांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे. ही गाडी केवळ स्वस्तच नाही, तर मोठ्या संख्येने प्रवाशांना सामावून घेणारी आहे. अमृत भारत एक्सप्रेसमध्ये एकूण २२ डब्यांचे नियोजन करण्यात आले असून त्याची रचना खालीलप्रमाणे आहे. आरक्षणाशिवाय प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सर्वाधिक जागा. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आरामदायी शयनयान व्यवस्था. दिव्यांग प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्यासाठी स्वतंत्र आणि सुलभ प्रवेशाचा डबा (कंपार्टमेंट) देण्यात आला आहे. १ पॅन्ट्री कार (खाद्यपदार्थांसाठी), २ सेकंड क्लास-कम-लगेज-कम-गार्ड व्हॅन. ही गाडी पूर्णपणे नॉन-एसी (विनावातानुकूलित) असली तरी, त्यामध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि सोयीसाठी अनेक बदल करण्यात आले आहेत. प्रत्येक डब्यात आधुनिक स्वच्छतागृहे, मोबाइल चार्जिंग पॉईंट्स आणि प्रवासादरम्यान हादरे बसू नयेत यासाठी 'पुश-पुल' तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.