नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा नितीन नवीन यांनी स्वीकारल्यानंतर आयोजित सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी केवळ नवीन यांच्या नेतृत्वाचे कौतुकच केले नाही, तर "नितीन नवीन आता माझेही बॉस आहेत," असे म्हणत पक्षसंघटनेत कार्यकर्त्याचे स्थान सर्वोच्च असल्याचे अधोरेखित केले. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी अत्यंत विनम्रपणे स्वतःचा उल्लेख एक 'कार्यकर्ता' म्हणून केला. ते म्हणाले, "लोकांना वाटत असेल की नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, ५० व्या वर्षी मुख्यमंत्री झाले आणि गेली २५ वर्षे सरकारचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. हे सर्व एका बाजूला आहे, पण माझ्या जीवनातील सर्वात मोठी आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे मी 'भाजपचा कार्यकर्ता' आहे. नितीन नवीन आता आपल्या सर्वांचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे ते माझेही बॉस आहेत आणि ही शिस्त पाळणे माझ्यासाठी गौरवास्पद आहे."
NDA च्या समन्वयाची मोठी जबाबदारी
पंतप्रधानांनी केवळ भाजपपुरतेच मर्यादित न राहता, नवीन यांच्यासमोर असलेल्या राष्ट्रीय आव्हानांचीही जाणीव करून दिली. ते म्हणाले की, नितीन नवीन यांना केवळ भाजपची संघटना सांभाळायची नाही, तर एनडीए (NDA) मधील सर्व मित्रपक्षांशी समन्वय साधून त्यांना सोबत घेऊन पुढे जावे लागणार आहे. ही जबाबदारी ते त्यांच्या संयमी स्वभावामुळे यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.
नितीन नवीन यांच्या कार्याचा गौरव
पंतप्रधानांनी नबीन यांच्या संघटन कौशल्याचा उल्लेख करताना त्यांच्या साधेपणाचे आणि अनुभवाचे कौतुक केले. नवीन यांच्या संपर्कात येणारी प्रत्येक व्यक्ती त्यांच्या साधेपणाची चर्चा करते. भाजप युवा मोर्चाची धुरा असो, विविध राज्यांचे प्रभारी म्हणून केलेले काम असो किंवा बिहार सरकारमधील मंत्रिपदाचा अनुभव, नवीन यांनी प्रत्येक ठिकाणी स्वतःला सिद्ध केले आहे. ज्यांनी त्यांना जबाबदारी दिली, त्या सर्वांना नवीन यांच्या कामाचा नेहमीच अभिमान वाटला आहे, असेही पंतप्रधानांनी नमूद केले. पंतप्रधानांनी ज्या पद्धतीने एका तरुण अध्यक्षाचे स्वागत केले आणि स्वतःला त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारा कार्यकर्ता मानले, यामुळे उपस्थित हजारो कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. ही घटना भाजपमधील लोकशाही आणि संघटनात्मक शिस्तीचे एक मोठे उदाहरण मानली जात आहे.
विकसित भारताची धुरा आता 'मिलेनियल' अध्यक्षांच्या हाती
"२१ व्या शतकातील पहिली २५ वर्षे सरली असून, येणारा आगामी २५ वर्षांचा कालखंड भारतासाठी अत्यंत निर्णायक आहे. याच कालखंडात 'विकसित भारताचे' स्वप्न साकार होणार आहे आणि या महत्त्वाच्या प्रवासाच्या सुरुवातीला नितीन नवीन भाजपचा वारसा समर्थपणे पुढे नेतील," असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. भाजपचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते. पंतप्रधानांनी नितीन नवीन यांच्या वयाचा आणि अनुभवाचा उल्लेख करताना त्यांना 'मिलेनियल' (Millennial) पिढीचे नेते म्हटले. मोदी म्हणाले की, "नितीन जी अशा पिढीचे आहेत ज्यांनी देशातील मोठे सामाजिक आणि आर्थिक बदल डोळ्यांदेखत पाहिले आहेत. ही ती पिढी आहे ज्यांनी एकेकाळी रेडिओवरून मिळणाऱ्या सूचनांवर अवलंबून राहण्यापासून ते आज 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (AI) वापरण्यापर्यंतचा प्रवास केला आहे." नवीन यांच्याकडे आधुनिक तंत्रज्ञान आणि जुन्या मूल्यांचा सुरेख संगम असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचे जे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, त्यात नितीन नबीन यांचे नेतृत्व महत्त्वाची भूमिका बजावेल, असे पंतप्रधान म्हणाले. नवीन यांच्याकडे असलेल्या ऊर्जेचा आणि त्यांच्या प्रदीर्घ संघटनात्मक अनुभवाचा फायदा भाजपच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना होईल. आधुनिक युगातील आव्हाने पेलण्याची क्षमता त्यांच्या पिढीमध्ये असून, ते पक्षाला अधिक तंत्रस्नेही आणि गतिशील बनवतील, अशी आशा मोदींनी व्यक्त केली. पंतप्रधानांनी नमूद केले की, नितीन नवीन यांनी केवळ बदल पाहिले नाहीत, तर ते पचवून स्वतःला सिद्ध केले आहे. "त्यांच्याकडे असलेल्या अनुभवाचा उपयोग पक्षाच्या विस्तारासाठी आणि कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी होईल. येणारी २५ वर्षे ही केवळ भाजपसाठीच नाही, तर संपूर्ण देशासाठी परिवर्तनाची आहेत आणि या परिवर्तनाचे सारथ्य करण्यासाठी नवीन यांच्यासारखा ऊर्जावान नेता पक्षाला मिळाला आहे," असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले.
अध्यक्ष बदलले तरी आदर्श तेच!”
"भारतीय जनता पक्षात पदभार बदलणे ही केवळ एक व्यवस्था आहे, पण कार्यभार ही आयुष्यभराची जबाबदारी असते. आमच्याकडे काळानुसार अध्यक्ष बदलतात, पण पक्षाचे मूळ आदर्श कधीही बदलत नाहीत. नेतृत्व बदलले तरी आमची ध्येयधोरणे आणि दिशा तीच राहते," अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या संघटनात्मक संस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले. भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात जनसंघाच्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याचा उल्लेख केला. ते म्हणाले, "जनसंघाच्या वटवृक्षातूनच भाजपचा जन्म झाला आहे. आज भाजप जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष बनला आहे, त्यामागे लक्षावधी कार्यकर्त्यांचा त्याग, तपस्या आणि बलिदान आहे. त्या सर्व ज्ञात-अज्ञात कार्यकर्त्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. भारताची लोकशाही किती मजबूत आहे, हे जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाच्या या प्रवासावरून दिसून येते." भाजप केवळ एक राजकीय पक्ष नसून तो एक 'संस्कार' आणि 'परिवार' असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. "आमच्या पक्षात केवळ सदस्यत्व (Membership) नसते, तर आम्ही एकमेकांशी नात्याने (Relationship) जोडले गेलो आहोत. भाजप ही अशी परंपरा आहे, जिथे काम केवळ पदाने नाही तर एका निश्चित प्रक्रियेने चालते. पद मिळणे ही तात्पुरती व्यवस्था असू शकते, पण देशासाठी काम करणे ही आमच्यासाठी आजीवन जबाबदारी आहे," असे पंतप्रधान मोदींनी नमूद केले. देशातील आणि जगातील राजकीय समीक्षकांनी भाजपच्या या लोकशाही प्रक्रियेची दखल घेतली पाहिजे, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले. एका सामान्य कार्यकर्त्यापासून ते राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंत पोहोचण्याची जी प्रक्रिया भाजपमध्ये आहे, ती इतर कोणत्याही पक्षात पाहायला मिळत नाही. नेतृत्व बदलले तरी पक्षाची राष्ट्रवादाची दिशा आणि गरिबांच्या कल्याणाचे आदर्श सदैव स्थिर राहतात, हा संदेश त्यांनी या भाषणातून दिला. नितीन नवीन यांच्या रूपाने एका तरुण नेतृत्वाकडे सूत्रे जाताना, हा बदल म्हणजे केवळ व्यक्तीचा बदल नसून पक्षाच्या सातत्यपूर्ण प्रवासाचा एक भाग आहे, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. नव्या ऊर्जेसह जुने आदर्श घेऊन पक्ष पुढे जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.