नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक रचनेत आज एका नवीन अध्यायाची सुरुवात झाली. बिहारचे कॅबिनेट मंत्री नितीन नवीन यांनी मंगळवारी भाजपचे १२ वे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अधिकृतपणे पदभार स्वीकारला. राजधानी दिल्लीत पार पडलेल्या या भव्य सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ज्येष्ठ नेते, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते. या निवडीमुळे भाजपने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तरुण नेतृत्वाकडे पक्षाची सूत्रे सोपवल्याचे स्पष्ट झाले आहे.
बिनविरोध निवड आणि नवा विक्रम
नितीन नवीन यांची ही निवड बिनविरोध झाली आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आणि छाननीच्या प्रक्रियेनंतर त्यांच्या विरोधात कोणताही उमेदवार रिंगणात नसल्याने त्यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला. भाजपचे राष्ट्रीय निवडणूक अधिकारी के. लक्ष्मण यांनी रात्री उशिरा त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. विशेष म्हणजे, अवघ्या ४५ व्या वर्षी अध्यक्षपद भूषवणारे ते भाजपचे आतापर्यंतचे सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष ठरले आहेत. यापूर्वी हा विक्रम नितीन गडकरी यांच्या नावावर होता.
नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आणि बिहारचे माजी आरोग्यमंत्री नितीन नवीन यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड निश्चित ...
कोण आहेत नितीन नबीन?
नितीन नवीन हे भाजपचे दिग्गज दिवंगत नेते नवीन किशोर सिन्हा यांचे पुत्र आहेत. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. पाटण्यातील 'बाँकीपूर' या भाजपच्या बालेकिल्ल्यातून ते सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. सध्या ते बिहार सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) मंत्री म्हणून कार्यरत आहेत. अभाविप (ABVP) पासून राजकारणाची सुरुवात करणाऱ्या नबीन यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि बिहार प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या अनपेक्षित विजयात आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील कामगिरीत नबीन यांचा संघटनात्मक वाटा अत्यंत मोलाचा मानला जातो. बिहारमधील 'कायस्थ' या अल्पसंख्याक समुदायातून येणाऱ्या नितीन नबीन यांची निवड करून भाजपने एक मोठा संदेश दिला आहे. केवळ जातीपातीचे गणित न पाहता, संघटनात्मक क्षमता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह यांच्या कार्यशैलीशी जुळणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी दिल्लीतील झेंडेवालान देवी मंदिर आणि कनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात दर्शन घेऊन आशिर्वाद घेतले.
पक्षाची नवीन दिशा
नितीन नवीन यांच्या निवडीवर प्रतिक्रिया देताना भाजप खासदारांनी सांगितले की, पक्षाचा हा निर्णय तरुण रक्ताला संधी देणारा आणि अनुभवाची जोड देणारा आहे. आगामी विधानसभा निवडणुका आणि पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याचे मोठे आव्हान आता या तरुण अध्यक्षांसमोर असणार आहे.