कोणत्या पक्षात कोण आहेत यासाठी दावेदार
मुंबई : मुंबई महापालिकेची निवडणूक प्रक्रिया पार पडून नगरसेवक निवडून येताच सर्वांना आता महापौर कुणाचा यावरून प्रश्न पडू लागला असून माध्यमांनीही आपल्या मनातील महापौर घोषित करून टाकला आहे. परंतु महापौर पदासाठी आरक्षण सोडत निघणे आवश्यक आहे. या पदासाठी आरक्षण सोडतीची लॉटरी पार पडत नाही तोवर कुठल्या आरक्षण गटातील नगरसेवकांची महापौर म्हणून वर्णी लागणार हे निश्चित होणार आहे. मात्र, महापौर पद हे एक असले तरी महापालिकेत प्रत्येक पक्षाचा गटनेता ठरवला जातो, या गटनेत्यावर कुणाची वर्णी लागते याकडेही जुन्या आणि अनुभवी नगरसेवकांचे लक्ष लागलेले आहे.
मुंबई महापालिकेच्या कामकाजात भाग घेण्यासाठी प्रत्येक पक्षाचा गटनेता हा महत्वाची भूमिका बजावत असतो. किमान सहा नगरसेवक असलेल्या पक्षाला गटनेता बनण्याचा मान मिळतो. त्यामुळे सहा नगरसेवकांच्या गणसंख्येनुसार त्यांचा किमान एक सदस्य हा वैधानिक तथा विशेष समित्यांवर निवड होते. तसेच या गटनेत्याला महापौरांच्या अध्यक्षतेखालील गटनेत्यांच्या सभेत स्थान मिळते आणि कोणत्याही विषयासंदर्भात आयुक्त महापौरांच्यावतीने बैठक बोलावून त्यावर प्राथमिक माहितीसह त्याला तत्वत: मंजुरी घेत असतात. त्यामुळे महापालिकेत महापौरांची निवड झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाचा गटनेता हा सभागृहनेता म्हणून कामकाज पाहतो तर विरोधी पक्षांचा गटनेता हा विरोधी पक्ष नेता म्हणून कामकाज पाहत असतो. त्यामुळे उबाठा, शिवसेना,भाजपा यांच्यामध्ये अनुभवी तथा जुने नगरसेवक असले तरी मनसे आणि एमआयएम या पक्षाकडे अनुभवी नगरसेवक नसल्याने नवीन नगरसेवकांचीच गटनेतेपदी वर्णी लावली जाणार आहे.
महापौर महायुतीचा असल्यास भाजप मोठा पक्ष असल्याने त्यांचा महापौर बनल्यास त्यांच्या पक्षाचा गटनेता हा सभागृहनेता असेल, किंवा शिवसेनेला महापौरपद दिल्यास भाजपाचा गटनेता हा सभागृहनेता असू शकेल. गटनेता बनल्यास आपल्या पक्षातील सर्व नगरसेवकांना मार्गदर्शन करणे तसेच संसदीय कामकाजात कशाप्रकारे भाग घेणे तसेच सभागृह तसेच बैठकांमध्ये काय रणनिती आखणे याचा आराखडा गटनेता ठरवत असतो. पक्षाच्या भूमिकेनुसार तथा निर्देशानुसार प्रत्येक गटनेत्यांची रणनिती ठरवली जात असते.
कोणत्या पक्षाचे कोण होऊ शकतात गटनेते
- भाजप : प्रभाकर शिंदे, मकरंद नार्वेकर, प्रकाश दरेकर,
- पक्षनेते पदासाठी : गणेश खणकर, नवनाथ बन, हरिष भांदीर्गे,
- उबाठा : यशोधर फणसे, विशाखा राऊत, किशोरी पेडणेकर, श्रध्दा जाधव, मिलिंद वैद्य,सचिन पडवळ
- शिवसेना : अमेय घोले, संजय घाडी, तृष्णा विश्वासराव, यामिनी जाधव
- काँग्रेस : अश्रफ आझमी, ज्ञानराज निकम, अजंता यादव, मेहेर मोहसीन हैदर,
- एमआयएमआयएम : मोहम्मद जमिर कुरेशी, खैरनुस्सा अकबर हुसेन
- मनसे : यशवंत किल्लेदार