पालघर : पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चा व आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने शहरात विशेष वाहतूक नियंत्रण आदेश जारी केला आहे. हा आदेश दि. १९ व २० जानेवारी या कालावधीत लागू राहणार आहे.
आंदोलनामुळे शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत पालघरमध्ये सर्व प्रकारच्या जड व अवजड वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.
बोईसर व मनोरकडून पालघरमध्ये येणारी तसेच पालघरहून बोईसर-मनोरकडे जाणारी जड वाहने शहरात प्रवेश करू शकणार नाहीत. या वाहनांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले असून, वाहनचालकांनी ते मार्ग वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी पोलीस विभाग, वाहतूक शाखा व संबंधित प्रशासकीय यंत्रणांमार्फत करण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. आंदोलन व यात्रेदरम्यान शहरातील वाहतूक सुरळीत राहावी आणि नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी सर्व वाहनचालक व नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.