नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आणि बिहारचे माजी आरोग्यमंत्री नितीन नवीन यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया झाली. अर्ज दाखल करण्याची मुदत संपेपर्यंत फक्त नितीन नवीन यांचाच अर्ज सादर झाला होता. यामुळे नितीन नवीन यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार हे निश्चित झाले. आता मंगळवार २० जानेवारी २०२६ रोजी पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत नितीन नवीन हे नड्डांकडून पदभार स्वीकारतील आणि भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सूत्रं हाती घेतील.
नितीन नवीन यांच्या रुपात पहिल्यांदाच भाजपमध्ये बिहारमधून राष्ट्रीय अध्यक्षाची निवड झाली आहे. पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांचा नितीन नवीन यांना पाठिंबा आहे. ज्यावेळी नितीन नवीन पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष झाले त्याचवेळी एक मेहनती, निष्ठावान, पक्षासाठी समर्पित अशी व्यक्ती या शब्दात पंतप्रधान मोदी यांनी नितीन नवीन यांचे कौतुक केले. यावरुन पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांच्या मनात त्यांच्याविषयी असलेल्या भावनेचा अंदाज बांधता येतो.
भाजपच्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस, बिहार युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष, छत्तीसगडचे प्रभारी आदी सर्व संघटनात्मक पातळीवरील जबाबदाऱ्या नितीन नवीन यांनी प्रभावीरित्या हाताळल्या आहेत. या कामगिरीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही नितीन नवीन यांचे कौतुक केले आहे.
नितीन नवीन यांच्याविषयी हे माहिती आहे का ?
नितीन नवीन हिंदी भाषेत त्यांचे नाव हे नितीन नवीन असेच सांगतात आणि तशीच स्वाक्षरी करतात. पण इंग्रजीत त्यांचे नाव अनेक वर्षांपासून नितीन नबीन असेच लिहिले आणि ओळखले जाते. नितीन नवीन यांचे बालपण पिरमुहानी आणि लोहानीपूर परिसरात गेले. दिवंगत नवीन किशोर सिन्हा यांचे ते पुत्र आहेत. नितीन नवीन यांचा जन्म बिहारमध्ये पाटणात २३ मे १९८० रोजी झाला. दहावीपर्यंतचे शिक्षण सीबीएसई बोर्डातून बिहारमध्येच घेतल्यानंतर ते महाविद्यालयीन शिक्षणासाठी दिल्लीत आले. वडिलांचे २००५ मध्ये निधन झाल्यानंतर नितीन नवीन यांनीच पुढे वडिलांचा राजकीय वारसा चालवला. वडिलांच्या पश्चात पोटनिवडणूक जिंकल्यामुळे नितीन नवीन आमदार झाले. यानंतर प्रत्येक विधानसभा निवडणुकीत नितीन नवीन मोठ्या फरकाने जिंकत राहिले. पुढे तब्बल तीन वेळा ते बिहार सरकारमध्ये मंत्री झाले.
नवीन किशोर सिन्हा यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीने निवडणूक लढवावी अशी बिहारमधील भाजप नेत्यांची मागणी होती. पण नवीन किशोर सिन्हा यांच्या पत्नीने निवडणूक लढवणे टाळले आणि मुलाला उमेदवारी देण्याची पक्षाला विनंती केली. यानंतर नितीन नवीन यांनी सातत्याने पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी समर्थपणे हाताळली. पुढे नितीन नवीन यांचे बँक अधिकारी असलेल्या दीपमाला श्रीवास्वव यांच्याशी लग्न झाले. लग्नानंतर काही वर्षांनी दीपमाला यांनी बिझनेस सुरू केला तर नितीन नवीन हे राजकारणात रमले. मुलगी नित्या जन्माला आली. नितीन आणि दीपमाला या दांपत्याने संसार आणि इतर जबाबदाऱ्यांमध्ये सुरेख समतोल साधला.