मुंबई : नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील बिहार सरकारने मुंबईत बिहार भवन उभारण्यासाठी तब्बल ३१४.२० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प मुंबई पोर्ट ट्रस्ट परिसरातील एलफिंस्टन एस्टेट येथे उभारला जाईल. त्यासाठी सुमारे ०.६८ एकर (२७५२.७७ चौरस मीटर) क्षेत्रफळाची जमीन निश्चित करण्यात आली आहे.
प्रस्तावित बिहार भवन ३० मजली असेल. बेसमेंटसह या इमारतीची एकूण उंची सुमारे ६९ मीटर इतकी असेल. ही इमारत पूर्णपणे आधुनिक वास्तूशैलीत उभारली जाईल आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाईल. यात सौर पॅनेल, पाण्याच्या शुद्धीकरणासाठी एसटीपी प्रकल्प, तसेच हिरवळीचे क्षेत्र यासारख्या सुविधांचा समावेश असेल. दिल्लीतील बिहार भवनाप्रमाणेच येथे शासकीय कामकाजासाठी कार्यालये, ७२ आसनांची सभागृहे, प्रशासकीय विभाग आणि अत्याधुनिक पार्किंग व्यवस्था उपलब्ध असतील.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने, रोजगार, व्यवसाय, उपचार आणि इतर कारणांसाठी मोठ्या प्रमाणात बिहारमधील नागरिक येथे येतात. अशा वेळी हे बिहार भवन प्रवासी, विद्यार्थी आणि रुग्णांसाठी निवास, मार्गदर्शन आणि शासकीय सहकार्य मिळवण्यात मोठी मदत करेल. दरम्यान, बिहार भवन निर्माण विभागाने या प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला असून, सध्या परिसराची सीमा भिंत पूर्ण झाली आहे. प्रकल्पासाठी सल्लागाराची नियुक्ती झाली असून, लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होईल.