सिंगापूर : आसाममधील प्रसिद्ध गायक जुबीन गर्ग यांच्या मृत्यूविषयी असलेल्या संशयावर सिंगापूर पोलिसांच्या तपास अहवालामुळे पडदा पडण्याची शक्यता आहे. सिंगापूरमधील लाजरस आयलंडजवळ समुद्रात बुडून झालेला जुबीन गर्ग यांचा मृत्यू हा हत्येचा परिणाम नसून मद्यधुंद अवस्थेत घडलेला अपघात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
यॉट पार्टीदरम्यान १९ सप्टेंबर २०२५ रोजी जुबीन यांचा मृत्यू झाला होता. सुरुवातीच्या काळात जुबीन यांच्या मृत्यूमागे कट असल्याचा संशय कुटुंबीयांकडून व्यक्त करण्यात आला होता. मात्र पोलीस तपास, वैद्यकीय अहवाल आणि न्यायालयीन सुनावणीदरम्यान कोणत्याही प्रकारचा गुन्हेगारी हस्तक्षेप आढळून आलेला नाही, असे सिंगापूर पोलिसांनी कोरोनर न्यायालयात स्पष्ट केले.
तपासात असे समोर आले की, घटनेच्या वेळी ५२ वर्षीय जुबीन गर्ग मद्यधुंद अवस्थेत होते. यॉटवर आयोजित पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात मद्यपान झाले होते. सुरुवातीला समुद्रात उतरताना त्यांनी लाइफ जॅकेट परिधान केले होते. मात्र काही वेळाने त्यांनी ते काढून टाकले आणि पुन्हा घालण्यास नकार दिला. त्यानंतर समुद्रात उतरताच ते पाण्यात बुडाले.
पोस्टमार्टम अहवालानुसार मृत्यूचे कारण बुडणे हेच असल्याची पुष्टी झाली आहे. शरीरावर आढळलेल्या जखमा या बचाव कार्य आणि सीपीआर देताना झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. हत्येचे कोणतेही ठोस संकेत किंवा संशयास्पद बाबी आढळून आलेल्या नाहीत.
घटनेच्या वेळी यॉटवर सुमारे वीस जण उपस्थित होते. यामध्ये जुबीन यांचे मित्र आणि सहकारी यांचा समावेश होता. चौकशीत कोणालाही जबरदस्तीने मद्यपान करण्यास भाग पाडण्यात आले किंवा समुद्रात ढकलण्यात आले, असे पुरावे आढळले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, जुबीन गर्ग यांना उच्च रक्तदाब आणि अपस्माराचा आजार असल्याची माहितीही तपासात समोर आली आहे. यापूर्वी त्यांना स्ट्रोकचा त्रास झाला होता. घटनेच्या दिवशी त्यांनी नियमित औषधे घेतली होती की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.
ही दुर्दैवी घटना नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलच्या अवघ्या एक दिवस आधी घडली होती, जिथे जुबीन गर्ग यांचे सादरीकरण होणार होते. या प्रकरणावर सिंगापूरचे कोरोनर अंतिम अहवाल सादर करणार असून त्यानंतर अधिकृत माहिती जाहीर करण्यात येणार आहे.