कदम दाम्पत्याला दोरीने बांधून चोरटे फरार
माथेरान (वार्ताहर): पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानमध्ये टी स्टॉलवर अज्ञात चार चोरट्यांनी शस्त्रांचा धाक दाखवून जबरी चोरी केल्याची घटना नुकतीच घडली आहे. शिवाजी रोड परिसरातील वन ट्री हिल पॉईंटजवळ असलेल्या 'कदम टी स्टॉल'मध्ये हा प्रकार घडला असून, चोरट्यांनी दुकानमालक दाम्पत्याला दोरीने बांधून घरातील रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास केले. नारायण मारुती कदम आणि त्यांच्या पत्नी चंदा कदम हे दाम्पत्य दुकान बंद करून घरात बसले होते. त्यावेळी चार अज्ञात इसमांनी "सिगारेट पाहिजे" असे म्हणत दुकानात प्रवेश केला. कदम यांनी दुकान बंद असल्याचे सांगण्यापूर्वीच चोरट्यांनी चाकू आणि सुऱ्याचा धाक दाखवत त्यांना धमकावले. चोरट्यांनी कदम दाम्पत्याला दोरीने बांधून ठेवत घरातील कपाटांची उचकापाचक केली. यात घरातील सुमारे एक लाख रुपये रोख आणि ७ ते ८ तोळे सोन्याचे दागिने असा मिळून अंदाजे ५ ते ६ लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आणि काही क्षणातच पोबारा केला.
माथेरानमधील अनेक प्रेक्षणीय पॉईंट्स आणि बंगले हे मुख्य गावापासून दूर आणि एकाकी ठिकाणी आहेत. अशा निर्जन ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांवर आणि छोट्या व्यावसायिकांवर होणाऱ्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. मात्र, या चोरीमुळे माथेरानमधील व्यापारी आणि रहिवाशांमध्ये सुरक्षेबाबत तीव्र चिंता व्यक्त केली जात असून, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे. घटनेची माहिती मिळताच माथेरान पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अनिल सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. परिसरातील हालचाली, ये-जा मार्ग तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.या घटनेनंतर माथेरानमधील सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कामानिमित्त रोज बाहेरून येणाऱ्या कामगार, गडी यांच्यावर कोणतेही बंधन किंवा नोंद नसल्याने गुन्हेगारीला वाव मिळत असल्याची नागरिकांची भावना आहे. गावात कोणाचे पाहुणे आले की प्रवेशद्वार येथून चौकशी केली जाते, मात्र पर्यटक सोडून दररोज ३०० ते ४०० बाहेरील लोक विविध कामासाठी ये–जा करतात, त्यांच्यावर कोणताही तपास किंवा कर आकारला जात नाही. त्यामुळे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कामगारांचे ओळखपत्र तपासणे, त्यांची नोंद ठेवणे तसेच दस्तुरी नाक्यावर प्रवेश फी आकारणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.