नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तराखंड सरकारने चारधाम यात्रेची मर्यादा आणि शांतता अबाधित राखण्यासाठी यावर्षी पावले उचलली आहेत. शनिवारी ऋषिकेश येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत गढवाल आयुक्त विनय शंकर पांडेय आणि गढवाल आयजी राजीव स्वरूप यांनी यात्रेच्या नियोजनाचा आढावा घेतला.
गेल्या काही वर्षांत मंदिराच्या आवारात रील बनवणे, फोटोशूट करणे आणि गाणी लावल्यामुळे विवादाचे प्रसंग निर्माण झाले आहेत. त्यामुळे यावर्षी बदरीनाथमधील सिंहद्वारापासून ते केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीच्या गाभाऱ्यापर्यंत मोबाईल नेण्यास मनाई असणार आहे. भाविकांचे मोबाईल सुरक्षित ठेवण्यासाठी मंदिर समिती आणि जिल्हा प्रशासन ठिकठिकाणी ‘मोबाईल लॉकर’ किंवा विशेष काउंटरची व्यवस्था करणार आहे. यात्रेकरूंच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी डॉक्टरांची ड्युटी १५ दिवसांच्या रोटेशनवर लावण्यात येणार आहे. चार डॉक्टरांचे एक पॅनेल तयार केले जाईल, ज्यात तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश असेल. तातडीच्या उपचारांसाठी एअर ॲम्ब्युलन्सचीही सोय केली जाणार आहे.
नोंदणी प्रक्रियेत कोणताही बदल नाही; ६०% ऑफलाइन आणि ४०% ऑनलाईन नोंदणी पूर्वीसारखी सुरू राहील. हरिद्वारमध्ये सध्या ३८ नोंदणी काउंटर आहेत आणि गरज पडल्यास त्यांची संख्या वाढवली जाईल. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी यमुनोत्री व गंगोत्री मार्गावर मोठ्या बसेसऐवजी ‘छोटी शटल बस सेवा’ सुरू करण्याचा विचार आहे. एनएच आणि बीआरओला ३१ मार्चपर्यंत सर्व रस्ते दुरुस्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावर्षी चारधाम यात्रेसाठी मोठे आव्हान आहे, कारण २०२३ मध्ये विक्रमी ५६ लाख पर्यटकांनी यात्रा केली होती. प्रशासनाने ६.३५ कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली असून तयारी ‘फास्ट ट्रॅक’ मोडवर सुरू आहे. या निर्णयामुळे मंदिरांमध्ये केवळ भक्तीचे वातावरण राहील आणि भाविकांना अडथळ्याशिवाय दर्शन घेता येईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.