मुंबई : मुंबई आणि नवी मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. अटल बिहारी वाजपेयी शिवडी–न्हावाशेवा अटल सेतूवरील टोलमध्ये देण्यात आलेली ५० टक्के सवलत पुढील एक वर्ष कायम ठेवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याला अधिकृत मान्यता देण्यात आली.
या निर्णयानुसार १ जानेवारी २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत अटल सेतूवर टोलमध्ये अर्धी सवलत लागू राहणार आहे. यासोबतच इलेक्ट्रिक मोटार कार आणि इलेक्ट्रिक बस यांना अटल सेतूवर पूर्णपणे टोलमुक्त प्रवासाची सुविधा देण्याचा निर्णयही अधिसूचनेत समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे ई-वाहनधारकांसह नियमित प्रवाशांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाने यापूर्वी ४ जानेवारी २०२४ रोजी अटल सेतूवरील टोलमध्ये ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. आता हा निर्णय पुढे सुरू ठेवत प्रवाशांच्या सोयीला प्राधान्य देण्यात आले आहे. त्याचबरोबर इतर वाहनांसाठी एकेरी प्रवासाचे सुधारित टोल दरही निश्चित करण्यात आले आहेत.
नवीन टोल दरानुसार,
मोटार कार, जीप, व्हॅन आणि हलक्या मोटार वाहनांसाठी २५० २५०, २०० आणि ५० रुपये असा टोल आकारला जाईल.
हलके व्यावसायिक वाहन, हलके मालवाहू वाहन आणि मिनीबससाठी ४०० , ३२० आणि ८० रुपये टोल
ट्रक व बससाठी ८३० , ६५५ आणि १७० रुपये, तर तीन आसांच्या व्यावसायिक वाहनांसाठी ९०५ , ७१५ आणि १८५ रुपये टोल आकारला जाणार आहे.
अवजड बांधकाम यंत्रसामग्री आणि जमीन खोदाई यंत्रसामग्री वाहनांसाठी १३०० , १०३० आणि २७० रुपये,
अति अवजड वाहनांसाठी १५०० , १२५५ आणि ३२५ रुपये टोल निश्चित करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे मुंबई–नवी मुंबई प्रवास अधिक किफायतशीर होणार असून अटल सेतूवरील वाहतूक वाढण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः रोज प्रवास करणारे कर्मचारी, व्यापारी आणि ई-वाहनधारकांसाठी हा निर्णय दिलासादायक ठरणार आहे.