सध्या अस्तित्वात असलेल्या मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवरून दररोज हजारो वाहनांची कोंडी पाहायला मिळते. मात्र खंडाळा घाटातील अरुंद वळणं, पावसाळ्यात होणारी घसरण, अपघात आणि सुट्टीच्या दिवसांतील प्रचंड गर्दी यामुळे प्रवास अनेकदा चार ते पाच तासांपर्यंत लांबतो. या कायमस्वरूपी समस्येवर उपाय म्हणून सरकारने सध्याच्या मार्गाच्या समांतर एक अत्याधुनिक आणि वेगवान एक्सप्रेसवे विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.
हा नवा मार्ग जेएनपीए परिसरातील अटल सेतूजवळून सुरू होऊन थेट पुण्याजवळील शिवरे जंक्शनपर्यंत जाणार आहे. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च सुमारे १५ हजार कोटी रुपये असून, पहिल्या टप्प्यात पगोटे ते पनवेल चौक दरम्यानच्या मार्गाला आधीच मंजुरी देण्यात आली आहे.
नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या एक्सप्रेसवेवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. कमी वळणं, सुरक्षित वेगवान लेन, मजबूत पूल आणि आवश्यक ठिकाणी बोगदे उभारले जाणार आहेत. त्यामुळे घाटातील अपघातप्रवण भाग टाळले जातील आणि वाहतूक अधिक सुरळीत होईल.
या मार्गाचा फायदा केवळ मुंबई–पुणेपुरता मर्यादित राहणार नाही. हा एक्सप्रेसवे पूर्ण झाल्यानंतर मुंबई–पुणे–बेंगळुरू हा लांब पल्ल्याचा प्रवास सुमारे साडेपाच तासांत शक्य होईल. त्यामुळे उद्योग, व्यापार, लॉजिस्टिक्स, पर्यटन आणि बंदरांशी संबंधित क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे.
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे नितीन गडकरी आता आणखी एक पाऊल पुढे टाकत, भविष्यातील गरजा लक्षात घेऊन हा नवा सुपरफास्ट मार्ग उभारत आहेत. हा प्रकल्प म्हणजे केवळ रस्ता नसून, महाराष्ट्राच्या आर्थिक आणि दळणवळण विकासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.