अमित देशमुख यांनी चक्रव्यूह भेदले
लातूर : दलित, मुस्लिम आणि लिंगायत मतांचा आधार घेत आखलेल्या रणनीतीला भाजपच्या चुकीच्या प्रचाराची अप्रत्यक्षपणे साथच मिळाली आणि अमित देशमुख यांनी लातूर महापालिकेत कॉग्रेसचा झेंडा उंच राखता आला. दिवंगत विलासराव देशमुख यांच्या विरोधातील वक्तव्य लातूरकर सहन करत नाहीत, असा संदेशही लातूरकरांनी दिल्याचे मानले जात आहे. मराठवाड्यात कॉग्रेस वर्चस्वाची ही एकमेव महापालिका आहे. एकूण ७० जागांपैकी कॉग्रेस व वंचित बहुजन आघाडीने ४७ जागा जिंकल्या. वंचित बहुजन आघाडीने पाच जागा पटकावल्या. भाजपला २२ जागांवर समाधान मानावे लागले आणि भाजपचे सत्तास्वप्न भंगले.
कॉग्रेसचे नेते अमित देशमुख यांची या विजयामध्ये निर्णायक भूमिका बजावली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण कलेल्या एका चुकीच्या वक्तव्यामुळे कॉग्रेसचा कार्यकर्ता पेटून उठला. या निवडणुकीत लिंगायत मतदान पूर्णत: कॉग्रेसच्या बाजूने वळले. वंचित आघाडीबरोबर युती केल्याने दलित, मुस्लिम आणि लिंगायत अशी मतपेढी निर्माण झाली. त्यामुळे कॉग्रेसचा विजय झाल्याचे मानले जात आहे.
प्रचारादरम्यान पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड, माजी मंत्री बसवराज पाटील मुरूमकर, तसेच राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील, संजय बनसोडे, शिक्षक आमदार विक्रम काळे आदी नेत्यांनी अमित देशमुख यांच्यावर जोरदार टीका केली होती. मात्र त्यांना कोणतेही प्रतिउत्तर अमित देशमुख यांनी दिले नाही.
विजयानंतर अमित देशमुख म्हणाले, ‘ लातूर हे विलासराव देशमुख यांचे शहर आहे. लातूरकर आपल्या अस्मितेवर आणि ओळखीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना मतदानातून उत्तर देतात.’ त्यामुळे लातूरमध्ये हातच भारी ठरली. शिवसेना आणि राष्ट्रावादी कॉग्रेसला खातेही उघडता आले नाही. लातूरमध्ये पहिल्यांदाच स्वतंत्र ताकदीने लढणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला अपेक्षित यश मिळाले नाही. केवळ एका जागेवर त्यांना विजय मिळवता आला. पूर्व भागात एमआयएम उमेदवारांना मिळालेल्या मतांमुळेही राष्ट्रवादीला नुकसान झाल्याचे चित्र आहे.
महापालिकेत पक्षनिहाय बलाबल असे
काँग्रेस वंचित आघाडी : ४७ (यात चार वंचित)
भाजप : २२ राष्ट्रवादी अजित पवार : ०१