सांगलीत भाजप बहूमताच्या उंबरठ्यावर अडखळली

एका जागेसाठी देणार शिवसेनेला उपमहापौर


मुंबई : महायुतीत फाटाफूट झालेली, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची अघोषित आघाडी असतानाही भाजप सांगली महापालिकेच्या निवडणुकीत ३९ जागा पटकावत बहुमताजवळ पोहचली आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना शिंदे पक्षाशी बोलणी सुरू केली असून उपमहापौरपद देण्याच्या मोबदल्यात शिंदे सेना भाजपसोबत सत्तेत जाण्याची चिन्हे आहेत.


महापालिकेच्या सर्वच्या सर्व ७८ जागांचे निकाल शुक्रवारी सायंकाळी जाहीर झाले. यामध्ये ३९ जागा भाजपने जिंकल्या आहेत, तर बहुमतासाठी केवळ एका जागेची गरज भाजपला भासत आहे. काँग्रेसने मात्र, खासदार विशाल पाटील व आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी करत १८ जागा जिंकल्या आहेत. तर महायुतीमधून बाहेर पडून स्वबळावर निवडणूक लढविण्याचा फायदा उठवत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने १६ जागा जिंकून आपले वर्चस्व निर्माण केले आहे.


महापौर आमचाच होईल, सत्ता स्थापन करताना आमच्या विचाराविना सत्ताच स्थापन होणे अशक्य आहे असा दावा करणाऱ्या राष्ट्रवादीचा दावा मतदारांनी खोटा ठरवला आहे. या निवडणुकीत भाजपचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, निवडणूक प्रभारी शेखर इनामदार, पालक प्रभारी मकरंद देशपांडे आणि आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ यांची निवडणूक रणनीती यशस्वी झाल्याचे मानले जात आहे. भाजपकडून ७८ पैकी ५५ जागा जिंकण्याचा दावा जरी केला असला तरी बहुमताच्या जवळ मतदारांनी पोहचवले आहे. भाजपने जुने, नवे चेहरे देत असताना अनेक काही प्रस्थापितांना घरी बसविण्याचा प्रयत्नही केला. हा प्रयत्न झुगारून देत माजी उपमहापौर युवराज बावडेकर शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारीवर पुन्हा महापालिकेत आले आहेत. तर शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांचा पराभव भाजपच्या जिव्हारी लागणारा ठरला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेच्या एक दिवस अगोदर तडीपारीचा आदेश झालेले आझम काझी हे प्रभाग सहा मधून माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्यासह विजयी झाले. उच्च न्यायालयाने त्यांच्यावरील तडीपारीच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. नर्गिस सय्यद, योगेंद्र थोरात, अय्याज नायकवडी, दिगंबर जाधव, गीतांजली ढोपे-पाटील, मालन हुलवान, विजय घाडगे, अनिता वनखंडे आदी माजी नगसेवकांचा या निवडणुकीत पराभव झाला, तर हर्षवर्धन पाटील, सागर वनखंडे, चेतन सुर्यवंशी, मोहन वाटवे आदी नवे चेहरे या महापालिकेच्या सभागृहात पाहण्यास मिळणार आहेत.


बहुमतासाठी भाजपला केवळ एक जागेची गरज असून शिवसेनेचे दोन सदस्य निवडून आले आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांच्याशी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बोलणी सुरू केली आहेत. शिवसेनेला उपमहापौर पद देण्याची भाजपची तयारी आहे. त्या दिशेने बोलणी सुरू आहेत.


महापालिका निवडणुकीतील पक्षिय बलाबल असे


भाजप -३९


काँगेस- १८


राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार- १६


राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार-३


शिवसेना शिंदे- २


एकूण- ७८

Comments
Add Comment

पुण्यात शिवसेना शून्यावर बाद !

मुंबई : पुणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या युतीमध्ये केवळ १५ जागा भाजपने शिंदेसेनेला दिल्या होत्या.

Raj Thackeray : राज ठाकरेंचे मतदारांना पत्र, पत्रातील भाषेवरुन भाजपची राज ठाकरेंवर टीका

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निकालाने महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपचं निर्विवाद वर्चस्व सिद्ध

परभणीत मशाल पेटली, नांडेमध्ये कमळ फुलले

मुंबई : महापालिका निवडणुकीत सर्वत्र सत्ताधारी पक्षांचा बोलबाला दिसत असताना येथे मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे

मुंबई महापालिका निवडणूक निकालात काय घडले?

नार्वेकरांनी तिन्ही गड राखले मुंबई : कुलाबा विधानसभेत भाजपच्यावतीने विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर

उबाठा पहिल्यांदा बसणार मुंबईत विरोधी पक्षात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये मागील २५

राज्यातील २२ मनपात राज ठाकरेंच्या मनसेला भोपळा

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुकांचे निकाल लागले. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार,