आता डांबरीकरण नव्हे, 'काँक्रिटीकरण' होणार
डहाणू : डहाणू आणि पालघर तालुक्याला जोडणाऱ्या महत्त्वाच्या सागरी महामार्गाबाबत राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने डहाणू पारनाका ते कुरगाव (बोईसर) या दरम्यानच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्याऐवजी आता थेट 'काँक्रिटीकरण' करण्याचे निश्चित केले आहे. या निर्णयामुळे भविष्यात हा रस्ता अधिक मजबूत आणि अवजड वाहतुकीसाठी सक्षम होणार आहे.
डहाणू तालुक्यातील वाढवण येथे देशातील सर्वात मोठे बंदर उभे राहत आहे. या बंदरामुळे भविष्यात या भागात अवजड वाहनांची वर्दळ प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. ही बाब लक्षात घेऊन लोकप्रतिनिधींनी या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याची मागणी केली होती. नोव्हेंबर २०२६ मध्ये मुख्यमंत्री यांनी या मागणीला हिरवा कंदील दाखवत कामाची व्याप्ती बदलण्याचे आदेश दिले आहेत. ऑक्टोबर २०२४ मध्ये या रस्त्यासाठी कार्यादेश देण्यात आले होते. मात्र, तांत्रिक बाबी आणि निधीच्या उपलब्धतेमुळे हे काम आधीच रखडले होते. आता डांबरीकरणाऐवजी काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय झाल्यामुळे, २३ किमी पट्ट्यासाठी स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबवावी लागेल किंवा जुन्या निविदेत आर्थिक बदल करावे लागतील. या प्रशासकीय प्रक्रियेमुळे प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्यासाठी डहाणूवासीयांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. जरी कामाला विलंब होत असला, तरी काँक्रिटीकरणामुळे हा मार्ग खड्डेमुक्त आणि टिकाऊ होणार असल्याने पालघर-डहाणू दरम्यानचा प्रवास अधिक सुखकर आणि वेगवान होणार आहे. कुरगाव ते पालघर जिल्हा मुख्यालय हा रस्ता आधीच काँक्रिटचा झाला असून, आता डहाणूकडे जाणारा मार्गही त्याच धर्तीवर विकसित केला जाणार आहे.
नव्याने निविदा काढणार? : डहाणू पारनाका ते सफाळे वरई नाका दरम्यानचे काम संबंधित ठेकेदाराने निविदा रकमेपेक्षा कमी दराने घेतले होते. ५७.२५ किलोमीटर पैकी २३ किलोमीटर रस्त्याची कृती कक्षा व व्याप्ती बदलल्याने उर्वरित निविदा कायम ठेवून काँक्रिटीकरण होणाऱ्या भागासाठी पुन्हा नव्याने निविदा काढली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामात दोन किंवा अधिक ठेकेदारांवर काम केले जाण्याची शक्यता आहे.
पालघरमधील कामे प्रलंबित : हायब्रीड ऍन्युटी अंतर्गत होणाऱ्या या रस्त्याच्या रुंदीकरण व मजबुतीकरण प्रकल्पात पावसाळा संपल्यानंतर जिल्हा मुख्यालय संकुलापासून पालघर नगर परिषदेच्या हद्दीपर्यंतच्या क्षेत्रात कामाला आरंभ करण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्या दरम्यान जाहीर केले होते. मात्र या कामाची मंजूर निविदा व कार्यादेशाच्या कार्य कक्षेत बदल झाल्याने पालघर मधील काम रेंगाळले आहे.