विकासाच्या अजेंड्यावर जनतेची मोहोर
मुंबईकरांनी अन्य ब्रँडला नाकारले - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे”
ठाणे : राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना–भाजप महायुती बहुमताच्या उंबरठ्यावर पोहोचली असून, राज्यभरातील अनेक महापालिकांमध्ये महायुतीचे महापौर होतील, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
ठाणे, कल्याण–डोंबिवली, संपूर्ण एमएमआर आणि मुंबईत महायुतीने जोरदार मुसंडी मारली असल्याचे त्यांनी सांगितले. ठाण्यात शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले असून, एमएमआर परिसरातही चांगल्या जागा मिळाल्या आहेत. मुंबईतही शिवसेना–भाजप महायुतीचा महापौर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बहुमताच्या अगदी जवळ पोहोचलो असून, राज्यात अनेक ठिकाणी महायुती सत्ता स्थापन करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, निवडणुकीदरम्यान काही ठिकाणी भावनिक मुद्दे, भ्रष्टाचाराचे आरोप आणि विविध प्रकारचा प्रचार करण्यात आला. मात्र, मुंबईकरांनी आणि राज्यातील मतदारांनी भावनिकतेपेक्षा विकासालाच कौल दिला आहे. विकासविरोधी भूमिका घेणाऱ्यांना जनतेने नाकारले असून, विकास हाच ब्रँड जनतेने स्वीकारला असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने (उबाठा) १५० हून अधिक जागा लढवून सुमारे ६० जागा जिंकल्या, मात्र एकंदरीत जनतेने विकासाच्या अजेंडालाच पाठिंबा दिल्याचे त्यांनी नमूद केले.
केंद्रात आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार आणि मुंबई महापालिकेत महायुतीची सत्ता अशा ट्रिपल इंजिन सरकारचा मुंबईला मोठा फायदा होणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. भारत ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करत असताना, त्या प्रवासात मुंबईचा मोठा वाटा असावा, यासाठी विशेष नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईला जागतिक दर्जाचे, जगाला हेवा वाटेल असे आंतरराष्ट्रीय शहर बनवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या साडेतीन वर्षांत मुंबईसाठी करण्यात आलेल्या आणि सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, पुढील वर्षी मे महिन्यापर्यंत मुंबईतील सर्व प्रमुख रस्ते काँक्रीटचे करण्यात येणार असून, शहर खड्डेमुक्त झाल्याचे नागरिकांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळेल. मुंबईत सात ठिकाणी सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांट (एसटीपी) उभारले जात असून, यामुळे प्रदूषणमुक्त मुंबईकडे मोठे पाऊल टाकले जाईल. मेट्रो २, मेट्रो ३ आणि इतर मार्गांचे जाळे पूर्ण करण्यासाठी काम वेगात सुरू असून, पूर्वी रखडलेले प्रकल्प पुन्हा मार्गी लावण्यात आले आहेत.
बीकेसी आणि कुर्ला परिसरात नवीन ‘अँड-फ्रेंड’ ट्रान्सपोर्ट सिस्टीम उभारली जात असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईत नवीन वाहतूक पर्याय म्हणून पॉड टॅक्सीचा प्रयोग सुरू करण्यात आला असून, ठाणे–साकेत–गायमुख–फॉन्ट्रान मार्गामुळे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. गोरेगाव–मुलुंड लिंक रोड, बोरिवली टनेल आणि रिंग रोड प्रकल्पांमुळे शहरातील वाहतूक अधिक सुलभ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आरोग्य, स्वच्छता आणि पुनर्विकासाबाबत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि रुग्णालयांच्या सुविधा अपग्रेड केल्या जात असून, आरोग्य सेवांवर विशेष भर दिला जात आहे. धोकादायक इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्यात आली असून, झोपडपट्टीमुक्त मुंबईचा संकल्प पुन्हा नव्याने राबवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
“आम्हाला केवळ महापौरपद किंवा सत्तेची खुर्ची महत्त्वाची नाही, तर मुंबईकरांच्या जीवनात बदल घडवायचा आहे. मुंबईबाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत परतावा, ही आमची भूमिका आहे,” असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. मुंबईकरांनी आणि राज्यातील जनतेने दिलेला कौल आम्ही पूर्णपणे मान्य करतो. जिथे युती आहे, तिथे सत्ता स्थापन करणार आणि जिथे वेगळी समीकरणे आहेत, तिथे परिस्थितीनुसार निर्णय घेणार, असेही त्यांनी सांगितले.
या निकालामध्ये लाडक्या बहिणींचा मोठा सहभाग असल्याचे त्यांनी नमूद करत त्यांच्या योगदानाबद्दल विशेष आभार मानले. शिवसेना आणि भाजपची विचारधारा एकच असून, त्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही. आमचा अजेंडा साधा आणि स्पष्ट आहे. विकास, विकास आणि विकास, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
पत्रकार परिषदेत शेवटी त्यांनी ठामपणे सांगितले की, मुंबईला ट्रॅफिकमुक्त, प्रदूषणमुक्त, भ्रष्टाचारमुक्त आणि जागतिक दर्जाचे शहर बनवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. राज्यभरात महायुती बहुमताच्या जवळ पोहोचली असून, अनेक महापालिकांमध्ये महायुतीचे महापौर होतील. जनतेने विकासाचा कौल दिला आहे आणि त्याच विश्वासावर सरकार पुढील काळात मुंबई आणि महाराष्ट्राचा वेगाने विकास करेल असे सांगितले.
यावेळी खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना प्रवक्ते प्रकाश महाजन, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, ठाणे जिल्हा महिला संघटिका सौ. मीनाक्षी शिंदे आणि शिवसेनेचे सर्व निवडून आलेले नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.