प्रतिनिधी: आज दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी शेअर बाजार बंद राहणार आहे. तसे संकेत एक्सचेंजने दिल्याने आज दिवसभर शेअर बाजार बंद राहणार आहे. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्र महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इक्विटी, डेरिव्हेटिव्ह्ज, कमोडिटी विभागातील व्यवहार दिवसभर स्थगित राहणार आहेत. मुंबई स्टॉक एक्सचेंज (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार सोमवार दिनांक १२ जानेवारी रोजी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, 'महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीमुळे भांडवली बाजार विभागात गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी व्यापार सुट्टी म्हणून अधिसूचित करण्यात आले आहे.'
यापूर्वी एक्सचेंजने असेही म्हटले होते की १५ जानेवारी हा सेटलमेंट हॉलिडे म्हणून पाळला जाईल तर ट्रेडिंग खुले राहणार आहे.मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळे १५ जानेवारीला एनएसईसह बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजनेही ट्रेडिंग बंद राहील असे जाहीर केले.साधारणपणे शेअर बाजारात एका वर्षात सुमारे १५ ट्रेडिंग सुट्ट्या पाळल्या जातात शिवाय शनिवार आणि रविवारी नियमित सुट्टी असते.
मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ साठी १५ जानेवारी रोजी राज्य सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. १५ जानेवारी रोजी महापालिकेच्या हद्दीत येणारी सरकारी आणि निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, बँका आणि केंद्र सरकारच्या कार्यालयांना सुट्टी लागू असणार आहे.
कमोडिटी मार्केट मर्यादित वेळापत्रकानुसार चालणार -
दिवसाच्या पहिल्या सहामाहीत कमोडिटीजमधील व्यापार बंद राहील आणि संध्याकाळी ५ नंतर पुन्हा सुरू होणार आहे .