फडणवीस म्हणाले, मशिदींवरील भोंगे काढले पाहिजेत, ही भूमिका बाळासाहेब ठाकरे यांची होती. त्यांनी या संदर्भात स्पष्ट मागणी केली होती आणि सर्वोच्च न्यायालयानेही यावर निर्णय दिला आहे. मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना कोणतीही जोरजबरदस्ती न करता, सामंजस्याने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय समजावून सांगत भोंगे काढले होते. परंतु, निवडणूक जिंकण्यासाठी आता पुन्हा लाऊडस्पीकर लावण्याचे वचन दिले जात असेल, तर उद्धव ठाकरेंनी त्याचे उत्तर दिले पाहिजे. ‘आम्हाला निवडून द्या, आम्ही भोंगे परत लावू’ असा प्रचार करणे, यापेक्षा मोठे लांगुलचालन काय असू शकते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दोन्ही पक्षांसाठी अस्तित्वाची लढाई
ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत बोलताना ते म्हणाले, “माझ्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आले असतील तर ती माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. कारण बाळासाहेब ठाकरे यांनाही तेच अपेक्षित होते. मात्र हा प्रीतीसंगम नसून भीतीसंगम आहे. दोन्ही पक्षांसाठी अस्तित्वाची लढाई असल्यामुळे ते एकत्र आले आहेत,” असा टोला देखील फडणवीस यांनी लगावला.