२५ हजारांहून अधिक मनुष्यबळ तैनात
मुंबई : महापालिका निवडणुकीचा प्रचार थंडावल्यांनतर मतदान आणि मतमोजणीपर्यंतीची महत्त्वाची प्रक्रिया शांततेत, मोकळ्या आणि पारदर्शी वातावरणात पार पाडण्यासाठी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवल्याचा दावा मंगळवारी मुंबई पोलिसांनी केला.
मंगळवारी संध्याकाळी ५ च्या ठोक्याला निवडणूक प्रचार थांबला. प्रत्यक्षात त्यानंतरच पैसेवाटप, वस्तू वाटप सुरू होते, या अनुभवामुळे दाट लोकवस्तीचे, राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या प्रभागांमध्ये पोलिसांनी मंगळवार संध्याकाळपासून मतदान प्रक्रिया संपेपर्यंत विशेष उपाययोजना आखल्या आहेत. यात गस्त वाढवणे, राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसोबतचा समन्वय दृढ केल्याचे सांगण्यात आले. ठरावीक धर्म, समाज, भाषिक नागरिकांनी मतदानासाठी घराबाहेर पडूच नये या उद्देशाने ठरावीक राजकीय पक्ष स्वतःच्या सोयीने रणनिती आखतात. त्यामुळे त्या त्या प्रभागातील मतदानाचा टक्का घसरतो. असे प्रकार घडू नयेत, बोगस मतदान होऊ नये यासाठी सर्वत्र करडी नजर ठेवून आहोत, असे मुंबई पोलीस दलाकडून स्पष्ट करण्यात आले.
ठाकरे बंधूंनी बोगस मतदान, दुबार मतदान टाळण्याच्या उद्देशाने भगवा गार्ड या नावाने कार्यकर्त्यांची फौज प्रत्येक मतदान केंद्राबाहेर तैनात ठेवू, अशी घोषणा केली आहे. त्यामुळे निर्माण होणारा संघर्ष, राजकीय शत्रुत्वातून उद्भवणारी कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न हाताळण्यासाठी सज्ज असल्याचे पोलिसांनी सांगितले.
२५ हजार पोलीस तैनात : १५ जानेवारी रोजी आयुक्त देवेन भारती यांच्या थेट देखरेखीखाली १० अतिरिक्त पोलीस आयुक्त, ३३ पोलीस उपआयुक्त, ८४ सहायक आयुक्त यांच्यासह तीन हजारांहून अधिक पोलीस अधिकारी आणि २५ हजाराहून अधिक अंमलदार असा ताफा शहराच्या कानाकोपऱ्यात तैनात असेल. संवेदनशील प्रभागांमध्ये पोलीस बंदोबस्तासह एसआरपीएफ, क्युआरटी, बीडीडीएस, आरसीपी, गृहरक्षक दल आदी विशेष तुकड्या तैनात ठेवल्या जातील, असे सांगण्यात आले.