मोहित सोमण: जागतिक अस्थिरतेच्या फटक्यामुळे आजही शेअर बाजारात घसरण झाली आहे. त्यामुळे अखेरच्या सत्रात सेन्सेक्स २४४.९८ अंकाने घसरत ८३३८२.७१ व निफ्टी ६६.७० अंकांने घसरत २५६६५.६० पातळीवर स्थिरावला आहे. मोठ्या प्रमाणात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक धाकधूकीने बाजारातून काढल्याची शक्यता निर्माण झाल्याने बाजारात नकारात्मक कौल दिला गेला आहे. युएस बाजारातील राजकीय, आर्थिक अस्थिरता आशियाई बाजारासह भारतीय बाजारात परावर्तित झाल्याचे आज दिसून आले. दरम्यान घरगुती गुंतवणूकदारांनी आज नवी गुंतवणूक न वाढवता बाजारात काही प्रमाणात नफा बुकिंग केल्याचे दिसून येत आहे. सध्या तिमाही निकाल बाजारात येत असताना गुंतवणूकदारांनी सावधगिरीचा पवित्रा कायम ठेवल्याने आक्रमक पद्धतीने खरेदी वाढवली नाही. अशातच निफ्टी व्यापक निर्देशांकातील मिडकॅप ५० व स्मॉलकॅप ५०, मिडकॅप १००, स्मॉलकॅप १०० निर्देशांकात वाढ झाल्याने बाजारातील घसरणीची पातळी रोखली गेली. यासह मोठ्या प्रमाणात निफ्टीत कंसोलिडेशन झाल्याचे दिसून आले. २५९७८ व २५८९२ पातळीवर अनुक्रमे २० व ५० ईएमए (Exponential Moving Average EMA) दिसून आल्याने बाजारात घसरण स्पष्ट झाली असली तरीही बँक निर्देशांकातील चांगल्या कामगिरीमुळे बाजार किरकोळ आकडेवारीत सावरण्यास मदत झाली. बँक निफ्टीचे २० व ५० दिवस ईएमए अनुक्रमे ५९४९१, ५८९३१ दरम्यान प्रतिरोध दिसल्याने बाजारातील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी मदत झाली.निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ मेटल (२.७०%), पीएसयु बँक (२.१३%), मिड स्मॉल फायनांशियल सर्विसेस (१.४६%), तेल व गॅस (०.५४%), मिड स्मॉल हेल्थकेअर (०.५९%) निर्देशांकात झाली असून सर्वाधिक घसरण आयटी (१.०८%), ऑटो (०.६९%), रिअल्टी (०.९२%), एफएमसीजी (०.६१%) निर्देशांकात झाली आहे.
युएस बाजारातील एकीकडे युएस फेडरल रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असताना दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प विरूद्ध फेड बँकेच्या गव्हर्नर कूक यांच्या हकालपट्टी विरोधासह जेरोमी पॉवेल यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे संकेत युएस बाजारात मिळाले होते यासह डोनाल्ड ट्रम्प यांच्या अतिरिक्त शुल्क टॅरिफ विरोधातील याचिकेची सुनावणी न्यायालय प्रविष्ट असल्याने गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता कायम होती. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्या इराणवरील नव्या विधानावरून जागतिक शेअर बाजार आणखी अस्थिर होत कमोडिटी बाजारात विक्रमी उच्चांकावर दरपातळी आज पोहोचली होती. एकूणच या अस्थिरतेचा फटका शेअर बाजारात बसत असताना रूपयाने किरकोळ सुधारणा केल्याने बाजारातील घसरण अखेरच्या सत्रात मंदावली. कच्च्या तेलाच्या निर्देशांकासह सोन्याच्या व चांदीच्या निर्देशांकात दिवसभरात मोठी वाढ झाली आहे.
भारतीय बाजारात लार्जकॅप शेअर्समध्येही मोठी चढउतार दिसल्याने या ब्लू चिप्स शेअर्सने संमिश्र कामगिरी केली होती. एकूणच परिस्थिती घसरणीकडे गेली असली तरी बाजारात फंडा मेंटल सुधारत असल्याने कंसोलिडेशनची परिस्थिती निर्माण झाली असून बाजारात नफा बुकिंगही काही प्रमाणात वाढले. आशियाई बाजारातही अखेरच्या सत्रात बहुतांश तेजीचा कल दिसला असून अस्थिरतेमुळे युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात तिन्ही बाजारात घसरण झाली आहे. आज अखेरच्या सत्रात अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) हा १.०९% उसळला होता.
अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ एमएमटीसी (१२.६४%), ज्युपिटर वॅगन्स (१२.५६%), एमआरपीएल (९.०७%), युनियन बँक (७.८७%), हिंदुस्थान कॉपर (६.१८%), वेदांता (६.०५%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण टाटा इलेक्सी (४.९७%), वी गार्ड इंडस्ट्रीज (३.२६%), कल्याण ज्वेलर्स (३.०४%), हेक्सावेअर टेक्नॉलॉजी (२.९७%), प्रिमियर एनर्जीज (२.७२%), नेटवेब टेक्नॉलॉजी (२.६१%) समभागात झाली आहे.
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना अशिका इन्स्टिट्युशनल इक्विटीजने म्हटले आहे की,'आज भारतीय शेअर बाजारात मर्यादित श्रेणीत व्यवहार झाले. बेंचमार्क निफ्टी २५,६४८ अंकांवर उघडला, त्यानंतर तो वाढून २५,७९१ अंकांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला, परंतु ही गती टिकवून ठेवण्यात अपयशी ठरला आणि दिवसाच्या नीचांकाकडे घसरला, ज्यामुळे खरेदीचा अभाव दिसून आला. क्षेत्रनिहाय विचार केल्यास, धातू, कमोडिटीज, सीपीएसई, ऊर्जा आणि तेल व वायू क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदीचा ओघ दिसून आला आणि त्यांनी निर्देशांकाला मर्यादित आधार दिला. तथापि, रिअल्टी, आयटी, एफएमसीजी, ऑटो आणि इंडिया कन्झम्प्शन क्षेत्रातील शेअर्समधील सततच्या कमजोरीमुळे बाजारातील तेजीला मर्यादा आल्या आणि बाजार सुस्त राहिला. जागतिक स्तरावर, गुंतवणूकदार सावध राहिले कारण ते अमेरिका-भारत व्यापार वाटाघाटींशी संबंधित घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून होते, तर वाढलेल्या भूराजकीय तणावामुळे एकूण भावनांवर दबाव कायम राहिला.
डेरिव्हेटिव्ह्जच्या आघाडीवर, वाढलेल्या शेअर्सची संख्या घसरलेल्या शेअर्सपेक्षा किंचित जास्त होती, ११८ शेअर्स वाढले तर ११६ शेअर्स घसरले, जे बाजाराची तटस्थ स्थिती दर्शवते. डेरिव्हेटिव्ह्जच्या दृष्टिकोनातून, निफ्टी ऑप्शन्सच्या डेटानुसार २६००० आणि २५८०० स्ट्राइकवर सर्वाधिक कॉल ओपन इंटरेस्ट दिसून आला, जे मजबूत प्रतिरोध पातळी दर्शवते. दुसरीकडे, २५७०० आणि २५६०० स्ट्राइकवर सर्वाधिक पुट ओपन इंटरेस्ट तात्काळ आधार क्षेत्र दर्शवतो. पुट-कॉल रेशो (PCR) ०.६४ होता, जो व्यापाऱ्यांकडून सावध भूमिका घेतल्याचे सूचित करतो.एकूणच, बाजार मर्यादित श्रेणीत राहिला, आणि रात्रभराच्या जोखमीमुळे, विशेषतः उद्या बाजार बंद राहणार असल्याने, सहभागी सावध भूमिकेत राहिले. सध्याच्या जागतिक अनिश्चिततेमुळे, सहभागी पोझिशन्स पुढे नेण्यास नाखूष दिसले, ज्यामुळे व्यवहारांमध्ये सुस्ती आणि मर्यादित दिशात्मक हालचाली दिसून आल्या.
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,' भारत-अमेरिका व्यापार कराराबाबतच्या अनिश्चिततेमुळे देशांतर्गत बाजार सावध राहिले आणि परदेशी संस्थागत गुंतवणूकदार जोखीम घेण्यास कचरत होते. तथापि, या आठवड्यात वाटाघाटी पुन्हा सुरू झाल्याने नवीन आशा निर्माण झाल्या आहेत. अमेरिकेतील व्याजदर कपातीच्या अपेक्षेने किमती वाढल्यामुळे धातूंच्या क्षेत्राने बाजारातील तेजीचे नेतृत्व केले, ज्याला कमी महागाईचे आकडे आणि भूराजकीय तणावामुळे सुरक्षित गुंतवणुकीच्या मागणीचा पाठिंबा मिळाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप विभागांमध्ये निवडक खरेदीमुळे व्यापक बाजारांनी चांगली कामगिरी केली. जागतिक स्तरावर, गुंतवणूकदार अमेरिकेच्या डिसेंबरमधील पीपीआय आकडेवारी आणि प्रमुख बँकांच्या कमाईची वाट पाहत असल्याने इक्विटी बाजारात संमिश्र व्यवहार झाले. पुढे पाहता, लक्ष आर्थिक वर्ष २६ च्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालांवर केंद्रित होईल, जिथे माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे सुरुवातीचे निकाल अपेक्षेनुसार होते, तथापि, काही एकवेळच्या खर्चामुळे निव्वळ नफ्याच्या कामगिरीवर परिणाम झाला.'
आजच्या बाजारातील बँक निफ्टीवर विश्लेषण करताना एलकेपी सिक्युरिटीजचे तांत्रिक विश्लेषक वत्सल भुवा म्हणाले आहेत की,'हा निर्देशांक सध्या त्याच्या घसरत्या ट्रेंडलाइन ब्रेकआउट पातळीच्या वर स्थिरावत आहे आणि तो त्याच्या २०-दिवसांच्या आणि ५०-दिवसांच्या दोन्ही SMA च्या वर टिकून आहे, जे एक संरचनात्मकदृष्ट्या सकारात्मक स्थिती दर्शवते. तथापि, गती कमकुवत होत असल्याचे दिसत आहे,कारण आरएसआय (Relative Strength Index RSI) ५३ च्या जवळ आहे आणि तो किंचित खाली झुकलेला आहे, जे मजबूत खरेदीच्या गतीचा अभाव अधोरेखित करते. एकदा निर्देशांक ५९८०० पातळी निर्णायकपणे पुन्हा मिळवेल तेव्हा त्यात पुन्हा गती येण्याची अपेक्षा आहे. तोपर्यंत, निर्देशांक ५९०००–५९८०० पातळीच्या विस्तृत मर्यादेत व्यवहार करण्याची शक्यता आहे, जिथे ५०-दिवसांच्या एस एम ए (Simple Moving Average SMA) जवळ ५९२००–५९१५० हा एक महत्त्वाचा आधार क्षेत्र (Support Zone) म्हणून काम करेल, तर ५९८०० ही तात्काळ मर्यादेतील प्रतिकार पातळी (Immediate Resistance) म्हणून काम करत राहील.'
आजच्या बाजारातील रूपयांच्या हालचालींवर भाष्य करताना एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ रिसर्च विश्लेषक दिलीप परमार म्हणाले की,'मध्यवर्ती बँकेने अस्थिरता रोखण्यासाठी हस्तक्षेप करूनही, भारतीय रुपया तीन आठवड्यांतील नीचांकी पातळीवर घसरला आहे. आयात केलेल्या वस्तूंच्या किमती वाढत असल्याने आणि परदेशी निधीचा सतत बहिर्वाह (Outflow) होत असल्याने देशांतर्गत शेअर बाजाराला प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याने रुपयावर दबाव कायम आहे.तांत्रिक दृष्टिकोनातून, USDINR मध्ये तेजीचा कल दिसून येतो ज्याचा प्रतिकार स्तर (Resistance Level) ९०.४० रूपयांवर आहे. हा अल्पमुदतीचा दृष्टिकोन बदलण्यासाठी, ८९.९० रूपयांच्या आधार पातळीच्या खाली निर्णायक बंद होण्याची आवश्यकता असेल.'