मुंबई: मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक कामकाज व्यवस्थित पार पाडावे यासाठी आजपासून मुंबईत १,०६५ ‘बेस्ट’ बस खास सेवेत दाखल करण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या मागणीनुसार ‘बेस्ट’ ने या बस उपलब्ध करून दिल्या असून, त्या १३ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून ते १५ जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत निवडणूक कामांसाठी वापरण्यात येणार आहेत.
बेस्टच्या बसचा वापर मुख्यतः निवडणूक कर्मचारी, अधिकारी तसेच पोलिसांच्या येण्या-जाण्यासाठी वापर केला जाणार आहे. सध्या ‘बेस्ट’कडे २,७०० बस असून, त्यापैकी एक हजाराहून अधिक बस निवडणूक कालावधीसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे काही मार्गांवरील नियमित बससेवेत मर्यादित बदल होण्याची शक्यता आहे. या आधी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्येही अशाच पद्धतीने ‘बेस्ट’ बसचा वापर करण्यात आला होता. आज मंगळवारी निवडणूक प्रचाराचा अखेरचा दिवस असून सायंकाळी ६ नंतर जाहीर सभा, रॅली आणि रोड शोवर बंदी असणार आहे. त्यामुळे प्रचाराच्या तोफा शांत होत असतानाच, शहरात निवडणूक यंत्रणा सज्ज झाल्याचे चित्र आहे.