मातोश्रीचे 'खास' गिळत होते मुंबईकरांचा घास
मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने प्रचाराचा धडाका लावला असून, आता तरुणांना आकर्षित करण्यासाठी भाजपने एक धमाकेदार 'रॅप साँग' लाँच केले आहे. या गाण्याच्या माध्यमातून भाजपने गेल्या २५ वर्षांतील शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सत्तेवर जोरदार प्रहार केला असून, मुंबईचा 'वनवास' आता संपणार असल्याचा दावा केला आहे.
काय आहे रॅप गाण्यात?
या रॅप साँगची सुरुवातच मुंबईकरांच्या समस्या आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांनी होते. "कधी काळी मुंबईकरांच्या तोंडाचा घास पळवला जात होता, कारण तो घास 'मातोश्री'च्या जवळचे कोणीतरी खास खात होते," अशा शब्दांत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर थेट निशाणा साधला आहे. मुंबईत बदलाची आणि विकासाची आस आता पूर्ण होणार असल्याचे या गाण्यात म्हटले आहे. या रॅपमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कौतुक करण्यात आले आहे. "देवाभाऊंनी घेतला मुंबईकरांच्या स्वप्नपूर्तीचा ध्यास," असे म्हणत भाजपने आपल्या कार्यकाळातील मोठ्या प्रकल्पांची यादीच सादर केली आहे. यामध्ये कोस्टल रोड, मेट्रो प्रकल्प, अटल सेतू, मुंबईकरांच्या हक्काची घरे (BDD चाळ पुनर्विकास) यांसारख्या 'झकास' कामांमुळेच मुंबईकरांची स्वप्ने साकार होणार असल्याचे रॅपमध्ये अधोरेखित करण्यात आले आहे.
ठाकरे सरकारवर निशाणा
गाण्याच्या शेवटी, "भाजप-महायुतीमुळे आता मुंबईकरांचा २५ वर्षांचा वनवास संपणार," असा नारा देण्यात आला आहे. या गाण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने मुंबईचा चेहरामोहरा बदलल्याचे दाखवण्यात आले आहे.