उदय पिंगळे, mgpshikshan@gmail.com
सन २०२६ मध्ये नुकताच आपण प्रवेश केला, या नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा! झेरोदाच्या संकेतस्थळाचा द डेली ब्रिफ हा भाग आहे. ज्याचा उद्देश भारतीय बाजारपेठ आणि जगातील प्रमुख आर्थिक गोष्टी सोप्या भाषेत समजावून सांगणे आहे. फक्त काय घडले, तेवढंच नाही तर का आणि कसे ते ही तिथे सांगितले जाते. या वर्षी पुढे आवासून उभे असलेले काही प्रश्न-
●जगातील दोन महाशक्तींतील संघर्षाचा त्यांच्या आणि जगाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतील?
जगामध्ये दोन प्रमुख महाशक्ती अमेरिका आणि चीन या सन २०२६ मध्ये आर्थिक बदलाच्या टप्प्यावर आहेत. अमेरिकेने टॅरिफ वाढवले, स्थगित केले, पुन्हा लागू केले, पण अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसलेला नाही. चीनच्या अर्थव्यवस्थेतील मालमत्ता क्षेत्र कोलमडले असले तरीही निर्यात वाढत आहे; परंतु सन २०२६ मध्ये या धोरणांचा परिणाम स्पष्ट पाहायला मिळेल का, हा अजूनही
प्रश्नच आहे.
●क्विक कॉमर्स (१०-मिनिटांत डिलिव्हरी) कंपन्या आणि स्टार्टअप नफ्यात येतील का?
पूर्वी लोक विचारत होते, १० मिनिटांत मिळणाऱ्या डिलिव्हरीची खरंच गरज आहे का? पण आता हे मॉडेल विशेषतः तरुणांत खूप लोकप्रिय झाले आहे. ब्लिंकिट, स्वीगी आणि झेप्टो यांसारख्या कंपन्या बाजारात आल्या आहेत आणि इतरही नवनवे प्लेयर्स आपल्या नावीन्यपूर्ण सेवांसह येत आहेत; परंतु विस्तारासाठी खर्च वाढल्यानंतर निव्वळ नफा कधी येईल हा प्रश्न आहे. कारण सध्या मार्केट शेअर मिळवण्यावर या कंपन्यांकडून पैसा पाण्यासारखा खर्च केला जातो आहे.
●कर्जांवरील व्याजदर आणखी किती
कमी होतील?
भारतीय रिजर्व बँकेने (RBI) सन २०२५ मध्ये रेपोरेट मोठ्या प्रमाणात कमी करून ५.२५% केला आहे. त्यामुळे बँकांनी त्यांचे कर्जावरील व्याजदर कमी केले आहेत. रेपोरेट सन २०२६ मध्ये हे अजून कमी होऊन कर्जे अधिक स्वस्त होतील का? रिजर्व बँक हे निर्णय महागाई, सकल राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ आणि जागतिक परिस्थिती पाहून घेते. सध्या या बाबींवर निश्चित उत्तर नाही.
●भारताच्या काही महत्त्वाच्या सुधारणांनी (Reforms) प्रत्यक्ष परिणाम दाखवले की नाही?
सन २०२५ मध्ये भारताने काही महत्त्वाच्या सुधारणा केल्या. उदा. त्यात वस्तू आणि सेवादरात बदल केले, नवीन कामगार कायदा आणला, काही गुणवत्ता नियंत्रण निर्णय मागे घेतले इत्यादी. या सर्व बदलांचा व्यवसायांवर आणि दीर्घकालीन आर्थिक वाढीत किती सकारात्मक परिणाम होईल, हे सन २०२६ मध्ये दिसून येणे अपेक्षित आहे.
●भारतीय लोक नैसर्गिक हिरेच अजूनही का पसंद करतात?
जागतिक हिऱ्यांचा बाजार बदलत आहे. कृत्रिम हिऱ्यांची मागणी वाढत आहे. त्यांची किंमत कमी आहे. तसेच ते पर्यावरणपूरक आहेत; परंतु भारतात अजूनही नैसर्गिक हिऱ्यांना परंपरा, प्रतिष्ठा आणि भावना यामुळे अधिक प्राधान्य देण्यात येते. यात हळूहळू बदल होत असला तरी भविष्यात हे बदलेल का? हे सन २०२६ मध्ये स्पष्ट होईल.
●भारत निर्यातीसाठी नवीन व्यापार बाजार शोधू शकेल का?
भारताच्या आयात निर्यातीत मोठी तफावत आहे. निर्यात कमी आयात जास्त, सध्या अमेरिकेतील मागणी कमी होताना दिसते त्यामुळे भारताने इंग्लंड, न्यूझीलंड, ओमान, संयुक्त अरब अमिरात आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांसोबत मुक्त व्यापार करार (FTA) केले आहे. पण EU आणि ASEAN यांसोबत करार लवकरच शक्य होतील का हे
महत्त्वाचे ठरेल.
सूक्ष्म उधारी (Microfinance) चक्र
कोठे आहे?
किरकोळ रकमेचे ऋण व्यवसाय हे ग्रामीण पैशाच्या प्रवाहावर अवलंबून असते. जेव्हा अर्थव्यवस्था मंदावते तेव्हा हे ऋण फेडण्यात कर्जदारास अडचणी येतात. २०२५ मध्ये NPAs (non-performing assets) वाढले होते, पण २०२५ च्या शेवटच्या महिन्यांत ते कमी होताना दिसत आहेत. २०२६ मध्ये हा चक्र पुन्हा सामान्य स्तरावर येईल का हे पाहणे महत्त्वाचे आहे.
●AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) हा एक बबल आहे का-तर त्याचा परिणाम कोणाला होईल?
AI तंत्रज्ञानाची सप्लाय चेन संपूर्ण जगभर पसरलेली आहे. जर AI मध्ये संकट आले तर ते सर्वत्र परिणाम करेल. अमेरिका, चीन, तैवान, दक्षिण कोरिया, भारत आणि इतर बाजार. मोठ्या कंपन्यांनी AI साठी खुप मोठी रक्कम खर्च केली आहे. आता त्याचा सुयोग्य परतावा मिळेल का, हे सन २०२६ मध्ये महत्त्वाचे ठरेल.
●भारतीय IT उद्योग AI लहरीमध्ये टिकून राहू शकेल का?
सन २०२५ मध्ये भारतीय IT क्षेत्राच्या दिग्गज कंपन्यांना वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागला. त्याचा परिणाम काही कंपन्यांनी कामगार कमी केले. त्यांची वाढ मंदावली. असं असलं तरी लहान, कौशल्य-आधारित कंपन्या AI आणि नव्या तंत्रज्ञानात पुढे आहेत. पारंपरिक कामाचे मॉडेल आता पुरेसे नाही. त्यामुळे २०२६ मध्ये भारतीय IT साठी बदल
आवश्यक आहे.
●भारताच्या हरित महत्त्वाकांक्षेनंतर सोलरनंतर
पुढे काय?
सन २०२५ मध्ये भारतात सौर ऊर्जा रेकॉर्ड पातळीवर पोहोचली; परंतु सौर ऊर्जा वाढल्यामुळे विजेचा साठा (storage) हा मोठा प्रश्न आहे. भारत वेगवेगळ्या स्टोरेज प्रकल्पांचा प्रयोग करत आहे. अनेक प्रकारचे बॅटरी पर्याय त्यासाठी आहेत; परंतु सोलरप्रमाणे स्टोरेजमधील मोठी वाढ सन २०२६ मध्ये किती जलद होईल हे पाहणे
महत्त्वाचे आहे.
सन २०२६ मधील आणखी काही
महत्त्वाचे प्रश्न :
◆युरोपिय युनियनने नव्यानेच लागू कार्बन बॉर्डर एडजस्टमेंट मेकॅनिझम CBAM नुसार हरित संरक्षणवाद म्हणून काही वस्तूंवर कर लादल्याने सुमारे २५% अतिरिक्त कर द्यावा लागणार आहे. त्याचा भारतीय निर्यातींवर नेमका काय
परिणाम होईल?
◆भारतातील न्यूक्लियर ऊर्जा क्षेत्रात खासगी गुंतवणूक वाढेल का?
◆भारताचा चिप उद्योग इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात यशस्वी होईल का?
◆सोनं आणि चांदीची किंमत अजून किती वाढेल?
◆खासगी भांडवली गुंतवणूक वाढेल का?
◆भारतात पूर्ण 5G rollout होईल का?
◆फार्मा उद्योग GLP-1 मध्ये पुढे येईल का?
येणारा काळच या आणि अशा सर्व प्रश्नांचा मागोवा घेण्यासाठी उपयुक्त ठरेल.