मुंबई : राज आणि उद्धव ठाकरे यांच्या कालच्या भाषणानंतर राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापले असून, भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली आहे. उद्योगपती अदानींवर सातत्याने टीका करणाऱ्या ठाकरे गटाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नितेश राणेंनी सोशल मीडियावर एक ट्विट केले असून, ते सध्या राजकीय वर्तुळात महत्वाचा विषय ठरला आहे.
नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये ठाकरे बंधूंच्या धोरणांवर बोट ठेवत, “अदानी चालत नाही, पण ममदानी आणि मुलतानी चालतात?” असा सवाल उपस्थित केला आहे. या एका ओळीमुळे ठाकरे गटाची उद्योग, गुंतवणूक आणि विकासाबाबतची भूमिका पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
कालच्या भाषणावरून थेट पलटवार
राज आणि उद्धव ठाकरे यांनी कालच्या सभेत उद्योगसमूह, मुंबईतील प्रकल्प आणि भांडवलदारांवर टीकेची धार लावली होती. याच भाषणाचा संदर्भ घेत नितेश राणेंनी ठाकरे गटावर दुहेरी निकष लावण्याचा आरोप केला आहे. विकासाच्या नावाखाली काही उद्योगपतींना विरोध आणि काहींना मूकसंमती, अशी भूमिका ठाकरे गट घेत असल्याचा दावा त्यांनी केला.
‘विकासाला विरोध म्हणजे मुंबईचं नुकसान’
“मुंबईचा विकास रोखून धरायचा आणि मग भावनिक मुद्द्यांवर मतं मागायची,” अशी ठाकरे गटाची भूमिका आहे. नितेश राणे यांच्या मते, मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी मोठ्या गुंतवणुकीची गरज असताना केवळ राजकीय भूमिकेपोटी उद्योगांना विरोध करणे हे राज्याच्या हिताचे नाही. “जेव्हा राज्यात गुंतवणूक येते, रोजगारनिर्मिती होते, तेव्हा त्याला विरोध का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
सोशल मीडियावर प्रतिक्रिया, ठाकरे गट अडचणीत
नितेश राणेंचं हे ट्विट व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजप समर्थकांकडून या ट्विटचं समर्थन केलं जात असून, ठाकरे गटाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर ठाकरे गटाकडे या प्रश्नाचे उत्तरच नसल्याने ते मुकगिळून बसावे लागत आहे.
दरम्यान, नितेश राणेंच्या या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असून, BMC निवडणुकीच्या तोंडावर आरोप–प्रत्यारोपांची धार अधिक तीव्र होण्याची चिन्हं दिसत आहेत.