वॉशिंग्टन : जागतिक इंधन बाजारात मोठी उलथापालथ होत असून, अमेरिकेने व्हेनेझुएलावर प्रत्यक्ष ताबा मिळवल्यानंतर तेथील तेल व्यापाराची सूत्रे पूर्णपणे वॉशिंग्टनच्या हाती आली आहेत. या बदललेल्या राजकीय आणि आर्थिक परिस्थितीत भारताला पुन्हा एकदा व्हेनेझुएलाकडून कच्चे तेल खरेदी करण्याची संधी मिळू शकते, असे स्पष्ट संकेत ट्रम्प प्रशासनाने दिले आहेत. अमेरिकेच्या निर्बंधांमुळे गेल्या काही वर्षांपासून ठप्प झालेला हा व्यापार आता नव्या अटींनुसार अंशतः सुरू होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
भारत हा ऐतिहासिकदृष्ट्या व्हेनेझुएलाच्या कच्च्या तेलाचा एक मोठा ग्राहक राहिला आहे. सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील अनेक भारतीय रिफायनरीज या जड आणि सल्फरयुक्त तेलावर प्रक्रिया करण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहेत. त्यामुळे व्हेनेझुएलाकडून तेलपुरवठा सुरू झाल्यास भारताला तुलनेने स्वस्त दरात आणि विविध स्रोतांमधून तेल मिळण्याचा फायदा होऊ शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे ऊर्जा सचिव क्रिस्टोफर राइट यांनी सर्व देशांना व्हेनेझुएलाचे तेल विकण्याची तयारी दर्शवली आहे. ट्रम्प प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, भारत या प्रक्रियेत सहभागी होऊ शकतो, मात्र या व्यवहाराचे सूक्ष्म नियम आणि अटी अद्याप अंतिम झालेले नाहीत.
दरम्यान, माजी अध्यक्ष निकोलस मादुरो यांना सत्तेवरून हटवल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलासाठी एक नवीन आर्थिक आराखडा जाहीर केला आहे. या ‘मेगा प्लॅन’अंतर्गत अमेरिका स्वतः सुमारे ५० दशलक्ष बॅरल कच्चे तेल शुद्ध करून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री करणार आहे.