मुंबई : मनोरंजन विश्वासाठी धक्कादायक बातमी समोर आली असून, ‘इंडियन आयडॉल’च्या तिसऱ्या पर्वातून देशभर लोकप्रिय ठरलेले गायक आणि अभिनेता प्रशांत तमांग यांचे रविवारी निधन झाले. दिल्लीतील निवासस्थानी असताना प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारांपूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ४३व्या वर्षी त्यांच्या अकाली जाण्याने संगीतप्रेमींना मोठा धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत तमांग यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, यासंदर्भात अधिकृत वैद्यकीय अहवाल अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. नुकतेच ते अरुणाचल प्रदेशातील एका कार्यक्रमातून दिल्लीला परतले होते. त्यानंतरच ही दुर्दैवी घटना घडल्याचे सांगितले जात आहे.
चाहत्यांमध्ये शोककळा
प्रशांतच्या निधनाची बातमी पसरताच भारतासह नेपाळमध्येही शोककळा पसरली. दार्जिलिंग परिसर, गोरखा समाज आणि संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या अचानक जाण्यामुळे सहकलाकार, चाहते आणि सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींना मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, त्यांना याआधी कोणतीही गंभीर आरोग्य समस्या नव्हती, अशी माहितीही समोर येत आहे.
पोलीस खात्यातून संगीत विश्वापर्यंतचा प्रवास
दार्जिलिंग येथे जन्मलेले प्रशांत तमांग मूळचे नेपाळी भाषिक होते. संगीताची आवड असूनही त्यांनी सुरुवातीला कोलकाता पोलिस दलात कॉन्स्टेबल म्हणून सेवा बजावली. पोलिस दलाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमधून त्यांचा आवाज अनेकांना परिचित झाला. याच आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी ‘इंडियन आयडॉल सीझन ३’मध्ये सहभाग घेतला आणि २००७ साली विजेतेपद पटकावले.
या यशानंतर त्यांनी नेपाळी संगीतविश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. निवडक पण आशयघन गाणी, सांस्कृतिक मुळांशी नातं जपणारी गायकी आणि साधेपणामुळे त्यांचा श्रोत्यांशी खास भावनिक संबंध निर्माण झाला होता. काही अभिनय प्रकल्पांमधूनही त्यांनी प्रेक्षकांची दाद मिळवली.