बडोदा : भारताने न्यूझीलंड विरूद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकत विजयी सलामी दिली. बडोद्यात झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडले ५० षटकांत आठ बाद ३०० धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताने ४९ षटकांत सहा बाद ३०६ धावा केल्या. भारतीय संघाने बडोद्याचा सामना चार विकेट आणि एक षटक राखून जिंकला. या सामन्यात भारताकडून सर्वाधिक ९३ धावा करणारा विराट कोहली सामनावीर झाला.
भारताकडून रोहित शर्माने २६, शुभमन गिलने ५६, कोहलीने ९३, श्रेयस अय्यरने ४९, रवींद्र जडेजाने ४, केएल राहुलने नाबाद २९, हर्षित राणाने २९, वॉशिंग्टन सुंदरने नाबाद ७ धावा केल्या. न्यूझीलंडच्या काइल जेमीसनने चार तर क्रिस्टियन क्लार्क आणि आदित्य अशोकने प्रत्येकी एक विकेट घेतली. याआधी न्यूझीलंडची फलंदाजी झाली. किवींकडून डेव्हॉन कॉनवेने ५६, हेन्री निकोल्सने ६२, विल यंगने १२, डॅरिल मिशेलने ८४, ग्लेन फिलिप्सने १२, मिशेल हेने १८, मायकेल ब्रेसवेलने (धावचीत) १६, झकरी फौल्क्सने १, क्रिस्टियन क्लार्कने नाबाद २४ आणि काइल जेमीसनने नाबाद ८ धावा केल्या. टीम इंडियाकडून मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी दोन तर कुलदीप यादवने एक विकेट घेतली.
विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उभारला धावांचा डोंगर
विराट कोहलीने बडोद्यात न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ९१ चेंडूत आठ चौकार आणि एक षटकार मारत ९३ धावा केल्या. तो जेमीसनच्या चेंडूवर मायकेल ब्रेसवेलकडे झेल देऊन परतला. पण बाद होण्याआधी कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगाने २८ हजार धावांचा टप्पा पार केला. त्याने सर्वाधिक वेगाने २८ हजार धावांचा टप्पा पार करणाऱ्या सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला.
सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ३४ हजार ३५७ धावा केल्या आहेत तर विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २८ हजार ०१७ धावा केल्या आहेत. विराट कोहली कसोटी आणि टी ट्वेंटी या आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रकारांतून निवृत्त झाला आहे. पण एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळत आहे.
रोहित शर्माचा षटकारांचा विक्रम
रोहित शर्माने बडोद्यात न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात २९ चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकार मारत २६ धावा केल्या. तो जेमीसनच्या चेंडूवर मायकेल ब्रेसवेलकडे झेल देऊन परतला. पण बाद होण्याआधी त्याने नवा विक्रम केला. रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६५० षटकारांचा टप्पा पूर्ण केला. ही कामगिरी करणारा तो जगातील पहिला फलंदाज आहे.
दुसरा एकदिवसीय सामना राजकोटमध्ये रंगणार
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना १४ जानेवारीच्या बुधवारी राजकोट येथे होणार आहे. हा सामना जिंकून मालिका जिंकण्याची संधी भारताकडे आहे.