प्रतिभारंग: प्रा. प्रतिभा सराफ
शाळेचे अनेक उपक्रम असतात. अशाच एका उपक्रमात शाळेतल्या विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक एका वृद्धाश्रमात नेण्यात आले होते. सर्व विद्यार्थी शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे ताठ बसले होते. समोर काही वृद्ध आपापल्या शारीरिक गरजेनुसार जमिनीवर, खुर्चीवर, बेंचवर तसेच व्हिलचेअरवरसुद्धा शांतपणे बसले होते! शिक्षक एकंदरीतच विद्यार्थ्यांना वृद्धाश्रम म्हणजे काय हे सांगत होते. सर्व वृद्ध निमूटपणे ऐकत होते. त्यांचे सर्व सांगून झाल्यावर शाळेच्या विद्यार्थ्यांचे मनोरंजनपर कार्यक्रम तिथे सादर होणार होते. शिक्षकांचे भाषण लांबल्यामुळे विद्यार्थी चुळबुळत होते. या पार्श्वभूमीवर एक विद्यार्थिनी एकटक एका वृद्ध स्त्रीकडे पाहत होती. त्या स्त्रीला पूर्वी कुठेतरी पाहिल्याचा तिला भास होत होता पण तिला आठवत नव्हते. खरंतर ती वृद्ध स्त्रीसुद्धा याच मुलीकडे एकटक पाहत होती. अचानक शिक्षकाने सांगितले की, आता विद्यार्थ्यांचे मनोरंजनपर कार्यक्रम होतील. विद्यार्थ्यांमध्ये उत्साह संचारला. शिक्षकाने सांगितले की या कार्यक्रमाची सुरुवात शारदास्तवनाने होईल. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि शिक्षकाने एका विद्यार्थिनीचे नाव घेतले - उर्वशी निखिल रणदिवे.
उर्वशी उठली आणि गाऊ लागली.
जय शारदे...
उर्वशीने दोनच ओळी गायल्या असतील तेव्हा एक वृद्ध स्त्री उठली आणि पळत येऊन तिने उर्वशीला मिठी मारली आणि म्हणाली “उरू....”
सर्व शिक्षकांसहित विद्यार्थी तसेच वृद्धाश्रमातील सगळेच अवाक् झाले. ‘उरू’ हे नाव ऐकताच उर्वशीला कळले की ती आपलीच आजी आहे. साधारण पाच-सहा वर्षांनंतर ते असे भेटले. उर्वशी म्हणाली, “आजी कुठे होतीस गं तू...? मी रोज तुझी आठवण काढत होते. हे शारदाश्रवण तूच शिकवलेस ना गं मला... बघ त्याचा मी रोज रिवाज करते.”त्या दोघींबरोबर तिथे हजर असलेल्या प्रत्येकाचे डोळे डबडबले. त्या दोघींच्या संभाषणातून इतरांना इतकेच कळले की उर्वशीला तिची आजी कोणत्या तरी नातेवाइकाकडे राहायला गेल्याचे, उर्वशीला सांगितले गेले होते.
वरील कथा ही सत्यकथेवर आधारित आहे. घरात नकोशा झालेल्या आणि गरीब परिस्थितीतील वृद्धांचे मोठ्या प्रमाणात आबाळ होत आहेत. सधन परिस्थितीतील वृद्धसुद्धा असेच कोणत्या तरी वृद्धाश्रमात अगदी स्वतःचे पैसे देऊन राहत आहेत. परदेशात राहत असलेल्या आपल्या अपत्यांना एकतर घरातील वृद्धांना सांभाळण्यासाठी वेळ नसतो किंवा या वृद्धांनाही परदेशात राहायचे नसते अशा वेळेस रोजच्या जीवनातील समस्या सोडवणे कठीण जाते आणि ते वृद्धाश्रमाचा पर्याय निवडतात. अलीकडे अतिशय उत्तम असे सर्व सुखसोयींने उपयुक्त घर, बंगले हे वृद्धाश्रमाचा भाग असतात जिथे या वृद्धांना घरात राहिल्याचा आनंदही मिळतो आणि त्याचबरोबर योग्य संरक्षणही मिळते.
उदाहरणच द्यायचे झाले तर घरातला नळ बिघडला असेल, गॅस बंद पडला असेल तर ते ठीक करण्यासाठी कोणाला बोलवायचे, हे त्यांना कळत नाही. आजकालच्या आधुनिक युगातील कॉल सेंटरला जोडल्या गेलेल्या समस्या निर्मूलन कक्षात फोन जोडला गेल्यावर तो त्यांना नीट हाताळता येत नाही. आणखी छोट्या-मोठ्या कामासाठी, दुखण्याखुपण्यावरील इलाजासाठी, आर्थिक व्यवहारासाठी जेव्हा बिनओळखीची माणसे घरात येतात तेव्हा ते पैशाच्या लोभाने या वृद्धांची फसवणूक करू शकतात, त्यांना इजा करू शकतात किंवा त्यांची हत्याही करू शकतात, अशी अनेक उदाहरणे आपल्या डोळ्यांसमोर आहेत. या पार्श्वभूमीवर वृद्धाश्रमातील संरक्षण वृद्धांना महत्त्वाचे वाटते.
शेवटी काय तर आपण आपल्या घरातील अपंग, आजारी आणि वृद्धांना सांभाळले पाहिजे ही शिकवण देणे सोपे आहे; परंतु ती निभावणे प्रचंड कठीण होत चालले आहे, असे लक्षात येऊ लागले आहे. त्यामुळे लेखाच्या सुरुवातीचा प्रसंग आणखीही कोणाच्या वाट्याला सहज येऊ शकतो! कोणी कोणाला काय सल्ला देणार? कारण आजच्या काळात प्रत्येक जण समस्याग्रस्त आहे. ज्या माणसांना स्वतःची मुले नाहीत, त्यांनी नेमके काय करायचे? त्यांच्यासाठी वृद्धाश्रम हा खूप चांगला पर्याय असू शकतो; परंतु जन्मदात्या आई-वडिलांना, आजी- आजोबांना सांभाळून वृद्धाश्रमाची संख्या कमी करता येईल का?, याचा विचार प्रत्येक संस्कारक्षम मनाने करायला नको का?
pratibha.saraph@ gmail.com