कर्मचाऱ्यांना सुट्टी तथा सवलत न देणाऱ्यांवर होणार कारवाई
तपासणीसाठी महापालिकेच्यावतीने दक्षता पथकाची स्थापना
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत गुरुवार, दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया होणार असून त्यासाठी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग आणि उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग यांनी याबाबतचा अध्यादेश निर्गमित केला आहे. ही सार्वजनिक सुटी बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात लागू राहणार आहे. या निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणी होते किंवा नाही यासाठी महानगरपालिका प्रशासनाने मुंबई शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे यांसाठी 'दक्षता पथक' स्थापन केले आहेत. हे पथम मतदानासाठी कर्मचाऱ्यांना पूर्णवेळ सुट्टी किंवा सवलत दिली आहे किंवा नाही याची तपासणी करेल आणि मतदान करण्यास सुट्टी तथा सवलत न देणाऱ्यांवर दुकाने आणि आस्थापना खात्यामार्फत कारवाई केली जाणार आहे.
मुंबईतील केंद्र व राज्य शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका आदींना सार्वजनिक सुटी लागू राहील. तसेच मुंबईतील मतदार जर शहराबाहेर कार्यरत असतील, तरी त्यांनाही मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ही सार्वजनिक सुटी लागू राहणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाच्या अध्यादेशात नमूद आहे. याबरोबरच उद्योग आणि कामगार विभागानेही सार्वजनिक सुटीबाबतचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित केले आहेत. उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने, खाजगी कंपन्यांतील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना, तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स , रिटेलर्स यांना सार्वजनिक सुटी लागू असेल.
अपवादात्मक परिस्थितीत अनुपस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल अशा धोकादायक अथवा लोकोपयोगी सेवेत अथवा आस्थापनांच्या संदर्भात संबंधित अधिकारी, कर्मचारी व कामगारांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल, तर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुटीऐवजी दोन ते तीन तासांची विशेष सवलत द्यावी, असेही अध्यादेशात नमूद आहे.
मुंबईतील दुकाने, कंपन्यांनी मतदानाच्यादिवशी सुटी किंवा सवलत न दिल्यास दुकाने व आस्थापना खात्यामार्फत कार्यवाही करण्यात येते. यासाठी मुंबई शहर, पूर्व उपनगरे व पश्चिम उपनगरे यांसाठी दक्षता पथक नेमण्यात आले आहेत. नागरिकांनी दूरध्वनी क्रमांक – ९१२२-३१५३३१८७ यावर संपर्क साधावा, असे आवाहनही महापालिकेने केले आहे.
मतदानाचा हक्क बजावा, महापालिका आयुक्तांचे आवाहन
लोकशाही प्रक्रियेत जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुटीचा निर्णय घेण्यात आला आहे. मतदानाच्या दिवशी कामाच्या कारणाने मतदार मतदानापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. मतदारांनी सक्रियपणे मतदान करून लोकशाहीच्या उत्सवात सहभाग नोंदवावा. गुरुवार, दिनांक १५ जानेवारी २०२६ या सार्वजनिक सुटीच्या दिवशी प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी केले आहे.