मुंबई : भारत आणि श्रीलंका येथे ७ फेब्रुवारीपासून रंगणाऱ्या आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ चा उत्साह शिगेला पोहोचला आहे. टीम इंडिया यावेळी गतविजेती म्हणून मैदानात उतरणार असली, तरी या मोहिमेचा शिल्पकार रोहित शर्मा मैदानात नसेल. रोहितने आंतरराष्ट्रीय टी-२० मधून निवृत्ती घेतल्याने चाहत्यांमध्ये काहीशी नाराजी आहे. मात्र, आयसीसीचे चेअरमॅन जय शाह यांच्या मनात रोहितचे स्थान आजही अढळ असल्याचे एका विशेष कार्यक्रमात दिसून आले. सोहळा नुकतेच मुंबईत रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने भारतीय विश्वविजेत्या संघांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या ऐतिहासिक सोहळ्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील पुरुष संघ, हरमनप्रीत कौरचा महिला संघ आणि दीप्ती केसीच्या नेतृत्वाखालील अंध महिला क्रिकेट संघाचा सन्मान करण्यात आला. या दिग्गज खेळाडूंच्या मांदियाळीत आयसीसी चेअरमॅन जय शाह यांनी मंचावर येताच सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
सूर्यकुमार यादवसमोर 'हिटमॅन'चा जयघोष
कार्यक्रमात सर्वांना चकित करणारा क्षण तेव्हा आला, जेव्हा जय शाह यांनी रोहित शर्माचा उल्लेख थेट "आमचा कर्णधार" असा केला. विशेष म्हणजे, ज्यावेळी शाह हे विधान करत होते, तेव्हा भारताचा सध्याचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादवदेखील तिथेच उपस्थित होता. जरी रोहितने निवृत्ती घेतली असली, तरी भारतीय क्रिकेटच्या यशात त्याचे नेतृत्व आजही सर्वोच्च असल्याचे शाह यांनी आपल्या विधानातून अधोरेखित केले. विश्वचषकाच्या अवघ्या काही दिवस आधी झालेल्या या विधानामुळे रोहितच्या नेतृत्वाचा आदर पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांचे ठाणेकरांना आश्वासन ठाणे : ''ठाणे आणि संपूर्ण एमएमआर क्षेत्रात वाहतुक कोडींचा प्रश्न गंभीर आहे. ही समस्या सरकारला ठाऊक आहे. ...
"दोन ट्रॉफी जिंकल्या, म्हणून रोहितच माझा कॅप्टन!"
मुंबईतील रिलायन्स फाउंडेशनच्या सोहळ्यात आयसीसी चेअरमॅन जय शाह यांनी रोहित शर्माला 'कर्णधार' संबोधल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, आपल्या भाषणादरम्यान शाह यांनी यामागचे अत्यंत तार्किक आणि भावनिक कारण स्पष्ट केले. "रोहित शर्मा इथेच बसला आहे आणि मी त्यालाच कर्णधार म्हणेन, कारण त्याने आपल्याला दोन मोठ्या ट्रॉफी जिंकून दिल्या आहेत," अशा शब्दांत जय शाह यांनी रोहितच्या नेतृत्वावर मोहोर उमटवली. जय शाह यांनी यावेळी फेब्रुवारी २०२४ मधील राजकोटच्या एका जुन्या घटनेची आठवण करून दिली. ते म्हणाले, "२०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात आपण सलग १० सामने जिंकले, दुर्दैवाने ट्रॉफी मिळाली नाही, पण आपण जगाची मनं जिंकली. तेव्हाच मी राजकोटमध्ये शब्द दिला होता की, यावेळेस आपण मनंही जिंकू आणि चषकही (ट्रॉफी) उंचावू. रोहितने आपल्या नेतृत्वाखाली ते करून दाखवलं."
कर्णधारपदाचा मान आजही रोहितकडेच
मंचावर भारताचा सध्याचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव उपस्थित असतानाही, जय शाह यांनी रोहितच्या कामगिरीचा गौरव केला. रोहितने केवळ सामने जिंकले नाहीत, तर भारतीय क्रिकेटला एका मोठ्या दुष्काळातून बाहेर काढले, म्हणूनच तो माझ्यासाठी आजही कर्णधार असल्याचे त्यांनी सूचित केले.
'किताब राखण्यासाठी' सूर्यकुमार सज्ज...
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने २०२४ चा टी-२० विश्वचषक जिंकून ११ वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. हा सिलसिला तिथेच थांबला नाही, तर मार्च २०२५ मध्ये भारताने पुन्हा एकदा रोहितच्याच कप्तानीत 'चॅम्पियन्स ट्रॉफी' उंचावून क्रिकेट विश्वात आपला दबदबा निर्माण केला. आता रोहितने टी-२० मधून निवृत्ती घेतल्यावर, या यशाची परंपरा पुढे नेण्याची मोठी जबाबदारी सूर्यकुमार यादव (सूर्या) याच्या खांद्यावर आली आहे. सूर्यासाठी ऐतिहासिक संधी येणारा २०२६ चा टी-२० विश्वचषक सूर्यकुमार यादव आणि भारतीय संघासाठी अत्यंत खास असणार आहे. याचे मुख्य कारण म्हणजे ही स्पर्धा भारताच्याच घरच्या मैदानावर रंगणार आहे. घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना भारताला आपले 'विश्वविजेतेपद' राखण्याचे (Title Defense) आव्हान असणार आहे. जर भारताने ही स्पर्धा जिंकली, तर मायदेशात टी-२० विश्वचषक जिंकणारा भारत हा जगातील पहिली संघ ठरेल. सूर्यकुमार यादवकडे केवळ जेतेपद राखण्याचीच नव्हे, तर स्वतःचा पहिला आयसीसी किताब जिंकणारा कर्णधार बनण्याची ऐतिहासिक संधी आहे.