मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
कल्याण : विरोधकांना निवडणुकीसाठी उमेदवार मिळत नव्हते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. तुम्हाला दु:ख का होत आहे? महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्याविषयी विरोधकांकडून नवा नरेटिव्ह पसरविला जात आहे. महायुतीचे उमेदवार जिंकून आले. यापूर्वी एव्हीचा नरेटिव्ह पसरविला गेला. आता बिनविरोधला विरोध करण्यास विरोधकांनी सुरुवात केली असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल चढविला.
केडीएमसीच्या निवडणुकीत पहिल्याच टप्प्यात महायुतीचे २१ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. यावरून विरोधकांनी टीका केली आहे. यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महापालिका निवडणुकीसाठी कल्याण पूर्वेत आयोजित जाहीर प्रचार सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपरोक्त टोला विरोधकांना लगावला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, यापूर्वी संसदेत ३५ खासदार बिनविरोध निवडून आले होते, त्यापैकी ३३ खासदार हे काँग्रेसचे होते. त्यावेळी लोकशाही जिवंत होती आणि आत्ता महायुतीचे उमेदवार निवडून आले, तर लोकशाहीची हत्या झाली, अशी टीका करणाऱ्या या सर्व विरोधकांनी कुठे तरी आरसा पाहिला पाहिजे, असा सल्ला मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना दिला आहे.
कल्याण, डोंबिवली शहराची ओळख हिंदुत्ववादी आहे. गेल्या ७० वर्षांत शहरांचा विकास झाला नाही. पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात महाराष्ट्राला ५० हजार कोटी रुपयांचा विकास निधी मिळाला आहे. २०१४ पूर्वी मुंबई महानगर प्रदेश विकासाच्या माध्यमातून एमएमआर रिजनमधील शहरांना विकास निधी मिळत नव्हता. महायुती सरकारच्या काळात माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपने ४ लाख कोटींचा निधी एमएमआर रिजनमधील शहरांच्या विकासासाठी दिला असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.