नांदेड : राज्यात आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. ताजी घटना नांदेड जिल्ह्यातील आहे. पत्नी कायमची माहेरी गेल्यामुळे पतीनं टोकाचं पाऊल उचललं. विक्रम सुरेश मारशेटवार (वय ३०) आणि शिवाजी विक्रम मारशेटवार (वय २ वर्ष) असं मयत पिता-पुत्राचं नाव आहे.
मंगळवारी सकाळी घटना झाली उघड
विक्रम सुरेश मारशेटवार आणि त्यांचा मुलगा शिवाजी हे दोघे सोमवारपासून शेजाऱ्यांना कोणालाही दिसले नव्हते. यामुळे बेपत्ता असलेल्या पितापुत्राचा शोध सुरू झाला. गावातील काही नागरिक शेताकडे गेले असता, त्यांना विहिरीच्या पाण्यात दोन मृतदेह तरंगताना दिसले. ही माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली आणि ग्रामस्थांनी विहिरीकडे धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच सिंदखेड पोलीस घटनास्थळी पोहोचले.
पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. पंचनामा केला नंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आले. दहेली तांडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. नंतर पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. गावात शोकाकुल वातावरणात दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी सिंदखेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, ठाणेदार रमेश जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करत आहेत.