दोन उमेदवारांकडे अब्जावधींची संपत्ती
विरार : वसई-विरार महापालिकेच्या मतदानाची तारीख जवळ जवळ येत असताना, उमेदवारांच्या प्रचाराला सुद्धा वेग आला आहे. प्रचाराच्या रणधुमाळीत आरोप प्रत्यारोप याबाबत चर्चा होत असल्या तरी सर्वाधिक चर्चा ही यनिवडणुकीतील उमेदवाराच्या संपत्तीची होत आहे. वसई-विरार मध्ये अनेक कोट्याधीश उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तर दोन उमेदवार हे अब्जाधीश असल्याचे दिसून येत आहे. वार्षिक बजेट ४ हजार कोटी रुपये असलेल्या वसई-विरार महापालिकेचा समावेश राज्यातील चार क वर्गातील महापालिकेमध्ये होतो.
सन २०११ च्या जनगणनेनुसार वसई-विरार शहराची लोकसंख्या १२ लाखांवर असली तरी, आज मात्र ही संख्या दुपटीने वाढली आहे. त्यामुळे या शहरासाठी राज्य आणि केंद्र शासनाकडून विविध योजनांसाठी कोट्यवधींचा निधी दिल्या जात आहे. दरम्यान, या पालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत. ११ लाख रुपयांची खर्च मर्यादा उमेदवारांना देण्यात आल्याने उमेदवार सुद्धा निवडणुकीसाठी चांगले खर्च करीत आहेत. या निवडणुकीच्या रिंगणात अनेक उमेदवार हे कोट्यधीश आहेत. तर दोन उमेदवार हे अब्जाधीश आहेत.
बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव माजी नगरसेवक अजीव पाटील यांच्या उमेदवारी अर्ज मालमत्ता विवरणपत्रामध्ये त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांची एकूण मालमत्ता ही २ अब्ज ९१ कोटी ६५ लाख ६७ हजार एवढी दाखविण्यात आली आहे. त्यानंतर पंकज ठाकूर हे दुसरे अब्जाधीश उमेदवार आहेत. पंकज ठाकूर यांच्या कुटुंबीयांची एकूण मालमत्ता १ अब्ज ४३ कोटी ९ लाख ६७ हजार एवढी दाखविण्यात आली आहे. तर अनेक उमेदवार हे कोट्याधीश आहेत.
जमीन, इमारती, गाळे, सदनिका, शेअर बाजारातील गुंतवणूक अत्याधुनिक वाहने, सोन्या चांदीचे दागिने आणि मोठी रोकड उमेदवारांनी दाखवलेल्या मालमत्तेच्या विवरण पत्रात नमूद आहे.
