पुणे : पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः हैदोस माजवत अनेक जणांना चावा घेतला आहे. या हैदोसामुळे संपूर्ण चाकण शहरात भीतीचं वातावरण पसरलं. जो कोणी समोर येईल त्याच्यावर कुत्रा झडप घालत होता. लहान मुले, महिला, वयोवृद्ध इतकंच नव्हे तर रस्त्यावरील इतर प्राण्यांनाही त्याने चावा घेतला. रस्त्यावरून जाणाऱ्यांवर अचानक हल्ले होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती.
पालिकेच्या यंत्रणांकडून वेळेत कोणतीही कारवाई न झाल्याने अखेर संतप्त नागरिकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या पिसाळलेल्या कुत्र्याला ठार केलं. मात्र, संकट तिथेच थांबलं नाही. त्या कुत्र्याने ज्या इतर भटक्या कुत्र्यांना चावा घेतला होता, ते कुत्रेही पिसाळले असल्याची शक्यता असून त्यांनीही नागरिकांवर हल्ले सुरू केले आहेत.
या संपूर्ण घटनेत चाकण परिसरातील तब्बल ४० नागरिक जखमी झाले आहेत. याशिवाय, इतर पिसाळलेल्या कुत्र्यांच्या हल्ल्यात आणखी पाच जणांना चावा घेतल्याची माहिती आहे. जखमी अवस्थेत नागरिक चाकण ग्रामीण रुग्णालयात धावले, तिथे धक्कादायक प्रकार समोर आला.
सरकारी रुग्णालयात रेबीज प्रतिबंधक लसींचा साठा उपलब्ध नसल्याने जखमी रुग्णांना पुण्यातील ससून रुग्णालय आणि पिंपरी-चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात रेफर करण्यात आलं. रक्ताने माखलेले कपडे, जखमांतून वाहणारं रक्त आणि मनात बसलेली भीती घेऊन नागरिकांना एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात धाव घ्यावी लागली.
प्रशासकीय अनास्थेमुळे जखमी नागरिकांच्या वेदनांमध्ये अधिकच भर पडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त आणि रेबीज लसींची उपलब्धता यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.