पुणे कनेक्शन उघड, १२ आरोपी अटकेत
अलिबाग : खोपोलीच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या निघृण हत्येप्रकरणी रायगड पोलिसांनी मोठा खुलासा केला असून, ही हत्या तब्बल २० लाखांच्या सुपारीतून करण्यात आल्याचे पोलीस तपासातून स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर या गुन्ह्याचे पुणे कनेक्शन समोर आले.
रायगड पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्येचा मुख्य सूत्रधार रवींद्र देवकर असून, त्याने इशा पापा शेख हिच्यामार्फत कॉन्ट्रॅक्ट किलरना सुपारी दिली होती. आदिल मुखत्यार शेख, खालीद खलिल कुरेशी आणि एका फरार आरोपीला मिळून २० लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले. आर्थिक व्यवहार, मोबाईल कॉल डिटेल्स आणि आरोपींच्या जबाबांच्या आधारे हा संपूर्ण कट उघडकीस आला. पोलीस तपासानुसार ही हत्या पूर्णतः पूर्वनियोजित होती. आरोपींनी अनेक दिवस मंगेश काळोखे यांच्या हालचालींवर लक्ष ठेवत रेकी केली आणि योग्य संधी साधून हा हल्ला केला. सुपारी घेणाऱ्या कॉन्ट्रॅक्ट किलरला पुण्यातून ताब्यात घेण्यात रायगड पोलिसांना यश आले असून, त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर तपासाला वेग आला आहे. एक आरोपी अद्याप फरार असून, त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत रवींद्र देवकर, त्याचा मुलगा दर्शन देवकर व धनेश देवकर, पत्नी उर्मिला देवकर, इशा पापा शेख, आदिल मुखत्यार शेख, खालीद खलिल कुरेशी, सचिन चव्हाण यांच्यासह एकूण १२ जणांना अटक करण्यात आली आहे. हत्येमागे जुने वैमनस्य आणि निवडणूक पराभवाचा राग कारणीभूत असल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.