मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या २२७ प्रभागांतील उमेदवारी अंतिम झाल्यानंतर पहिल्या रविवारी उमेदवारांनी मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटींना वेग दिला. सकाळी ७वाजल्यापासूनच उमेदवारांनी मतदारांना गाठणे सुरू केले. त्यात प्रामुख्याने सोसायट्यांच्या बैठका व प्रचार फेऱ्यांचा समावेश होता. प्रचारासाठी मोजकेच दिवस असल्याने रविवारी अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची तारेवरची कसरत सुरू होती. प्रमुख राजकीय पक्षांकडून मतदारसंघात आता नेत्यांच्या सभांचे आयोजन करण्यास सुरुवात झाली आहे. त्याद्वारे जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. प्रत्येक प्रभागात प्रमुख पक्षाच्या उमेदवारांकडून प्रचार कार्यालयांच्या उद्घाटनाचा धडाकाही सुरू आहे. रविवार सार्थकी लावण्यासाठी बोरीवली, चारकोप, मालाड, कांदिवली, मागाठाणे आणि दहिसर या उत्तर मुंबईतील मतदारसंघांतील उमेदवारांनी दिवसभर जास्तीत जास्त मतदारांच्या भेटी घेतल्या. काही उमेदवारांनी प्रचार फेऱ्यांऐवजी वैयक्तिक गाठीभेटींवर भर दिला. सोसायट्यांमधील एकगठ्ठा मते मिळवण्यासाठी उमेदवार सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत फिरत होते. त्यानंतर पुन्हा सायंकाळी ५ वाजता प्रचाराला सुरुवात होऊन रात्री १० वाजेपर्यंत पक्षाचे कार्यकर्ते प्रचारात होते.