ग्रामस्थांच्या नुकसानभरपाईचा प्रश्न प्रलंबित
सफाळे : मुंबई–अहमदाबाद अवघ्या १ तास ५८ मिनिटांत जोडणाऱ्या मुंबई–अहमदाबाद हायस्पीड रेल (एमएएचएसआर) अर्थात बुलेट ट्रेन प्रकल्पातील पालघर तालुक्यातील जलसार डोंगरातून जाणाऱ्या १,४८० मीटर लांबीच्या राज्यातील सर्वात मोठ्या डोंगराळ बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. विरार–बोईसर दरम्यान असलेला हा बोगदा अत्याधुनिक ड्रिल अॅण्ड ब्लास्ट पद्धतीने अवघ्या १८ महिन्यांत खोदण्यात आला आहे.
या बोगद्याच्या अंतिम टप्प्यातील अखेरचा स्फोट केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे प्रत्यक्ष पाहिला. त्यानंतर नवी दिल्ली येथून पालघरमधील बुलेट ट्रेन प्रकल्पातील दुसऱ्या बोगद्याचे काम पूर्ण झाल्याची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातील बुलेट ट्रेन मार्गावरील हा सर्वाधिक लांबीचा पर्वतीय बोगदा असल्याची माहिती त्यांनी दिली.
बोगद्याचे उत्खनन डोंगराच्या दोन्ही बाजूंनी करण्यात आले. उत्खननादरम्यान जमिनीच्या हालचालींचे रिअल-टाइम निरीक्षण करण्यात येत शॉटक्रिट, रॉक बोल्ट व लॅटिस गर्डर यांसारख्या आधार प्रणाली वापरण्यात आल्या. वायुवीजन, अग्निसुरक्षा तसेच प्रवेश व बाहेर पडण्यासाठी आवश्यक सर्व सुरक्षात्मक उपाययोजना काटेकोरपणे राबविण्यात आल्याचे पीआयबीच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. या कामादरम्यान झालेल्या स्फोटांमुळे जलसार व टेंभीखोडावे परिसरातील ४५७ ते ५०० घरांना तडे गेल्याचे तसेच अनेक कुपनलिकांचे नुकसान झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन देण्यात आले असले, तरी झालेल्या नुकसानीच्या सर्वेक्षणाबाबत ग्रामस्थ असमाधानी असून हा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. सुमारे सव्वा कोटी रुपयांची भरपाई देण्याची तयारी संबंधित ठेकेदार कंपनीने दर्शवली असली, तरी ती अपुरी असल्याचा ग्रामस्थांचा आक्षेप आहे.
बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे मध्यमवर्गीयांसाठी परवडणारा व जलद प्रवास उपलब्ध होणार असून, कॉरिडॉरच्या दोन्ही बाजूंना आर्थिक घडामोडींना चालना मिळेल, रोजगारनिर्मिती होईल आणि औद्योगिक तसेच आयटीक्षेत्राचा विकास होईल, असे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. तसेच हा प्रकल्प रस्ते वाहतुकीच्या तुलनेत कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनात सुमारे ९५ टक्के घट घडवून आणेल, असा दावा त्यांनी केला.एमएएचएसआर प्रकल्पाची एकूण लांबी ५०८ किमी असून त्यामध्ये २७.४ किमी बोगद्यांचा समावेश आहे.