पुणे : पुण्यातील क्रिकेट राजकारण सध्या चांगलंच तापले असून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा वाद निर्माण झाला आहे. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या एमसीए निवडणुकीत माजी भारतीय क्रिकेटपटू आणि भाजप पदाधिकारी केदार जाधव यांनी गंभीर आरोप केले असून यामुळे रोहित पवार अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
केदार जाधव यांच्या आरोपानुसार, २५ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आलेल्या नव्या मतदार यादीत अचानक ४०१ नवीन आजीव सभासदांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे जनरल बॉडीची सदस्यसंख्या १५० वरून थेट ६०० च्या पुढे गेली आहे. या नव्या सदस्यांपैकी २५ जण हे माजी कौन्सिल सदस्यांचे नातेवाईक असून १८ जण रोहित पवार यांचे नातेवाईक असल्याचा दावा जाधव यांनी केला आहे. याशिवाय ५६ सदस्य हे रोहित पवार यांच्या व्यवसायाशी किंवा वैयक्तिक कामाशी संबंधित असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या यादीत राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) पक्षाशी संबंधित ३७ नेत्यांचा समावेश असल्याचेही सांगितले जात आहे.
एप्रिल महिन्यात भाजपमध्ये प्रवेश केलेल्या केदार जाधव यांनी ‘कॅटेगरी ए’ मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. लोढा समितीच्या शिफारसींचे उल्लंघन करत क्रिकेट प्रशासनावर काही मोजक्या घराण्यांचे वर्चस्व निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नवीन सभासदांचा समावेश करताना असोसिएशनच्या घटनेत आवश्यक सुधारणा करण्यात आलेल्या नाहीत, तसेच सर्वोच्च न्यायालयाची परवानगीही घेतली नसल्याचा आक्षेप त्यांनी नोंदवला आहे.
या प्रकरणात केदार जाधव आणि लातूर क्रिकेट असोसिएशनचे कमलेश ठक्कर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे या वादाला कायदेशीर वळण लागले आहे.
दरम्यान, रोहित पवार यांचे समर्थक आणि एमसीएतील सध्याचे पदाधिकारी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. नव्या सभासदांची नियुक्ती ही नियमांनुसार करण्यात आली असून उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील समितीने ही प्रक्रिया पूर्ण केल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना विनाकारण राजकारण केलं जात असल्याचा आरोप माजी पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
या मतदार यादीत रोहित पवार यांच्या पत्नी कुंती पवार, सासरे सतीश मगर, खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे आणि बारामती ॲग्रोचे सुभाष गुळवे यांसारख्या नावांचा समावेश असल्याने पुणे मुख्यालय असलेल्या एमसीएची ही निवडणूक आता प्रतिष्ठेची बनली आहे.