मुंबई : नवीन वर्षाची सुरुवात हास्य आणि आनंदाने करण्यासाठी महाराष्ट्रातील प्रेक्षकांचा लाडका कार्यक्रम म्हणजेच तुमच्या टेन्शन वरची मात्रा महाराष्ट्राची हास्यजत्रा. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ पुन्हा एकदा नव्या दमात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कुटुंबांना एकत्र बसून मनमुराद हसवणारा हा शो आता नव्या सीझनसह परतत असून ५ जानेवारीपासून दर सोमवार आणि मंगळवार रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.
महाराष्ट्रातील लाखो घरांमध्ये हसण्याचं वातावरण निर्माण करणाऱ्या या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या दैनंदिन आयुष्यात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. दिवसभराच्या धावपळीतून थोडा वेळ काढून प्रेक्षक या शोसोबत ताणतणाव विसरून हसण्याचा आनंद घेतात. त्यामुळेच नवीन वर्षात हास्यजत्रेच्या पुनरागमनाची घोषणा होताच प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचं वातावरण पाहायला मिळत आहे.
या नव्या सीझनमध्ये पूर्णपणे नवीन संकल्पनांवर आधारित स्किट्स, नव्या व्यक्तिरेखा आणि काही खास ट्विस्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मराठमोळ्या विनोदाची ओळख कायम ठेवत सामाजिक विषयांवर आधारित प्रहसनं, नव्या कल्पना आणि ताज्या सादरीकरणामुळे हा सिझन अधिक रंगतदार ठरण्याची शक्यता आहे. प्रेक्षकांचा आवडता कलाकार ओंकार भोजने याचं पुनरागमन याआधीच चर्चेत आलं असून त्याच्या नव्या प्रहसनांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
कलाकारांची परस्पर केमिस्ट्री, अचूक टाइमिंगचे पंचेस, लोकजीवनाशी नातं सांगणारे विषय आणि भावनांना हात घालणारा विनोद हे या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य राहिलं आहे. कुटुंबांना एकत्र आणून हास्याच्या माध्यमातून सकारात्मकता पसरवण्याचा प्रयत्न हा शो सातत्याने करत आला आहे. नवीन सिझनमध्ये प्रेक्षकांना दुप्पट मजा आणि अधिक मनोरंजन मिळेल, असा विश्वास कलाकारांनी व्यक्त केला आहे.
५ जानेवारीपासून दर सोमवार आणि मंगळवार रात्री ९ वाजता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.