तिरुपती : मद्याच्या नशेत असलेल्या एका व्यक्तीने तिरुपतीमधील श्री गोविंदराजस्वामी मंदिरात धिंगाणा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांना चुकवून मंदिर परिसरात प्रवेश केल्यानंतर ही व्यक्ती मंदिराच्या भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करत असताना दक्षता कर्मचाऱ्यांच्या वेळीच लक्षात आले. तिरुपती संकुलात प्रवेश केल्यानंतर मद्यपी गोपुरमवर चढून कळसापर्यंत गेला. हे पाहून मंदिरातील अधिकारी आणि कर्मचारी गोळा झाले.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मंदिर प्रशासनाने तत्काळ पोलीस आणि अग्निशमन विभागाला याची माहिती दिली. मद्यपीने गोंधळ घातल्यामुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
मंदिरातील दक्षता अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मद्यपीचे नाव कुट्टाडी तिरुपती (४५) असल्याचे सांगितले जाते. तो तेलंगणाच्या निजामाबाद जिल्ह्यातील कुर्मवाडा येथील पेद्दामल्ला रेड्डी कॉलनीतील रहिवासी आहे. इतर भाविकांप्रमाणेच त्यानेही मंदिरात प्रवेश केला होता. यानंतर तंबूच्या खांबांचा वापर करून नदीमी गोपुरमवर चढला.
गोपुरमच्या कळसावर चढल्यानंतर मद्यपीने मद्याची बाटली मागितली. मद्याची बाटली आणून दिली तरच खाली उतरेन, अशी अट त्याने ठेवली होती. मंदिरातील दक्षता अधिकाऱ्यांनी त्याची मागणी मान्य केल्यानंतर तो स्वतःहून सुरक्षितपणे खाली उतरला.