ठाणे : ठाणे महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर आता खऱ्या अर्थाने राजकीय रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील बंडखोरांना शांत करण्यात वरिष्ठ नेत्यांना मोठ्या प्रमाणावर यश आले असले, तरी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या ८६ अपक्ष उमेदवारांनी प्रस्थापित राजकीय पक्षांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. ३३ प्रभागांतील चुरस आता या अपक्ष उमेदवारांच्या भूमिकेवर अवलंबून असणार आहे.
२०१७ नंतर तब्बल ९ वर्षांनी (२०२२ ची निवडणूक लांबणीवर पडल्यामुळे) ही निवडणूक होत असल्याने इच्छुकांची संख्या प्रचंड होती. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी (दोन्ही गट), उबाठा आणि मनसे या सर्वच पक्षांत उमेदवारीसाठी मोठी चढाओढ होती. महायुती आणि आघाडीच्या जागावाटपात अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले गेल्याने बंडखोरी उफाळून आली होती.
पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विजयात अडथळा ठरू शकणाऱ्या बंडखोरांचे मन वळवण्यासाठी नेत्यांनी कंबर कसली होती. यात ९० टक्के बंडखोरांचे अर्ज मागे घेण्यात नेत्यांना यश आले आहे. मात्र, तरीही १३१ जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत ८६ अपक्ष उमेदवार लढण्यावर ठाम आहेत. हे अपक्ष उमेदवार प्रामुख्याने तेच आहेत ज्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागात काम केले आहे, परंतु पक्षाने त्यांना तिकीट नाकारले. तब्बल ४-५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होणाऱ्या या निवडणुकीत ठाणेकर कोणाच्या पारड्यात वजन टाकतात आणि हे ८६ 'बंडोबा' कोणाचे गणित बिघडवतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
ठाणे पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत हौशे पोटी, तर, कोणी स्थानिक लोकप्रतिनिधीच्या कामावर नाराजी व्यक्त करीत, त्याविरोधात अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकत आवाहन देण्यात
येत आहे.त्यानुसार ठाणे पालिकेच्या ३३ प्रभागातील १३१ जागांसाठी १४१ अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यापैकी ५५ अपक्षांनी अर्ज माघारीत आपले उमेदवारी अर्ज मागे घेतेले असून प्रत्यक्ष ८६ अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रनांगणात उभे ठाकले आहे. त्यामुळे पक्षातील बंडखोरांचे बंड शमविण्यात राजकीय पक्षांना काहीअंशी यश आले असले तरी अपक्षांसह बंडखोरीचे आवाहन मात्र कायम असणार आहे.
उमेदवारांनी घेतली माघार
ठाणे पालिका निवडणुकीची धामधूम सुरू आहे. अशातच निवडणूक होण्याआधीच अर्ज माघारीच्या दिवशी अपक्षांसह काही स्थानिक पक्षाच्या उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे ठाणे पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा सात नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. माघार घेतलेल्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष, लोकराज्य पार्टी, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, जनता दल (सेक्युलर) आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षांचा समावेश आहे.
अपक्षांची 'डोकेदुखी' का वाढली?
निष्ठावंतांची नाराजी : वर्षानुवर्षे पक्षासाठी झिजणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे.
मतात विभागणी : अपक्ष उमेदवार जर ताकदवान असेल, तर तो अधिकृत उमेदवाराची हक्काची मते खाऊ शकतो, ज्याचा फायदा तिसऱ्याच पक्षाला होऊ शकतो.
प्रभागातील चुरस : अनेक प्रभागांत विजय-पराजयाचे अंतर कमी असते, तिथे हे ८६ अपक्ष निर्णायक ठरू शकतात.