छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना असून पहाटेच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात 'साईराम ट्रॅव्हल्स' या बसला भीषण आग लागली. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या या बसने समोरून येणाऱ्या ट्रकला जोराची धडक दिल्यानंतर हा प्रकार घडला. या दुर्घटनेत एका प्रवाशाचा होरपळून मृत्यू झाला असून, १ जण गंभीर जखमी झाला.
केवळ २७ माजी नगरसेवकांना नाकारले तिकीट मुंबई : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महायुतीच्या वतीने भाजपाकडून १३७ उमेदवारांच्या नावांची ...
नेमकं काय घडलं?
साईराम ट्रॅव्हल्सची (Bharat Benz MH19 CX 3015) बस मुंबईकडे जात असताना पहाटे ३ वाजेच्या सुमारास माळीवाडा टोलनाक्यापासून १५-१६ किमी अंतरावर हा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने किंवा अचानक समोर ट्रक (CG04 M 8711) आल्याने ट्रॅव्हल्सची ट्रकला पाठीमागून जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की, काही क्षणांतच बसने पेट घेतला.
मृत्यूचा थरार आणि बचावकार्य
घटनेच्या वेळी बसमध्ये २ चालक, १ कंडक्टर आणि २९ प्रवासी असे एकूण ३२ जण होते. आग लागताच प्रवाशांमध्ये मोठी पळापळ झाली. सुदैवाने ३१ जण बसमधून बाहेर पडण्यात यशस्वी झाले, मात्र खामगाव (बुलढाणा) येथील रहिवासी अमोल सुरेश शेलकर (वय ३८) यांचा या आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात आणखी एक प्रवासी गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अग्निशमन दलाची तत्परता
घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांनी ताफा घेऊन घटनास्थळ गाठले. आगीने रौद्ररूप धारण केले होते, मात्र जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग विझवली. दुर्दैवाने, तोपर्यंत बसचा सांगाडाच उरला होता. सध्या माळीवाडा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.