एच १-बी व्हिसाच्या कठोर नियमांमुळे कामात बदल
नवी दिल्ली : ॲमेझॉनने व्हिसा मिळण्यास विलंब होत असल्यामुळे भारतात अडकलेल्या काही कर्मचाऱ्यांना मार्चच्या सुरुवातीपर्यंत वर्क फ्रॉम होम करण्याची परवानगी दिली आहे. १७ डिसेंबरच्या एका अंतर्गत मेमोनुसार, जे कर्मचारी भारतात व्हिसा मिळण्याची वाट पाहत आहेत, ते २ मार्च २०२६ पर्यंत वर्क फ्रॉम होम करू शकतात. पण या तात्पुरत्या व्यवस्थेमध्ये त्यांना कोणत्या प्रकारचे काम करण्याची परवानगी आहे, यावर कठोर मर्यादा आहेत.
भारतातून वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या कोडिंगचे काम करण्याची परवानगी नाही, ज्यात ट्रबलशूटिंग, टेस्टिंग आणि डॉक्युमेंटेशनचा समावेश आहे. त्यांना धोरणात्मक व्यावसायिक निर्णय घेणे, वाटाघाटी करणे किंवा करारांवर स्वाक्षरी करणे, तसेच ग्राहकांशी संवाद साधणे देखील मनाई आहे. याव्यतिरिक्त, कर्मचाऱ्यांना भारतातील ॲमेझॉनच्या कार्यालयांमधून काम करण्यास किंवा कार्यालयांत जाण्यास परवानगी नाही.
ट्रम्प प्रशासनाने एच-१बी व्हिसा कार्यक्रमात केलेल्या बदलांमुळे व्हिसा प्रक्रियेत विलंब होत आहे. त्यामुळे अमेरिकन कंपन्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन नियमांनुसार, वाणिज्य दूतावासातील अधिकाऱ्यांना व्हिसा जारी करण्यापूर्वी अर्जदारांची सोशल मीडिया खाती तपासणे आवश्यक आहे. या अतिरिक्त तपासणीमुळे प्रक्रियेचा वेग मंदावला आहे आणि काही दूतावास व वाणिज्य दूतावासांनी अपॉइंटमेंट्स अनेक महिन्यांसाठी पुढे ढकलल्या आहेत.
नव्या परिपत्रकानुसार सवलतीत वाढ : या विलंबामुळे गुगल, अॅपल आणि मायक्रोसॉफ्टसह अनेक प्रमुख तंत्रज्ञान कंपन्यांनी विदेशी कर्मचाऱ्यांना अमेरिका सोडू नये, अशा सूचना केल्या आहेत. अमेरिकेच्या वर्क व्हिसावर असलेल्या कर्मचाऱ्यांना देशाबाहेर दीर्घकाळ मुक्काम टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रवास न करण्याचा इशारा देण्यात आला आहे. ॲमेझॉन व्हिसा नूतनीकरणासाठी विदेशातील कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम ऑफिस’ धोरणाला अपवाद म्हणून २० दिवसांपर्यंत वर्क फ्रॉम होम करण्याची परवानगी देते. आता नव्या परिपत्रकात भारतातील कर्मचाऱ्यांसाठी ही सवलत वाढवली आहे.