मुंबई: राज्यात सध्या १५ जानेवारीला येऊ घातलेल्या महानगरपालिकांच्या निवडणूकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातही महत्त्वाचे म्हणजे देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आणि देशाच्या आर्थिक नाड्या हातात असणाऱ्या मुंबईसारख्या शहराचा कारभार सांभाळणाऱ्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूकांबद्दल सर्वांना उत्सुकता आहे. महानगरपालिका निवडणुकांबद्दल उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत संपली आहे. अर्जांची छाननी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान मुलुंडमधून किरीट सौमय्यांच्या बाबतीत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या हा मुंबई महानगरपालिकेच्या मुलुंड परिसरातील प्रभाग क्रमांक १०७ मधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र, मतदानापूर्वीच नील सोमय्या यांचा विजय निश्चित मानला जात आहे. किरीट सोमय्या यांनी गुरुवारी सोशल मीडियावर एक पोस्ट करुन याबाबत भाष्य केले. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, "नील सोमय्या प्रभाग क्रमांक १०७ मधून लढत आहे. या वॉर्डमध्ये ठाकरे गट, मनसे, काँग्रेस आणि शरद पवार यांच्यापैकी कोणीही उमेदवार रिंगणात उरलेला नाही. मुलुंडमधील अन्य पाच प्रभागांमध्ये या सगळ्या पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत. देवाची लिला अपरंपार आहे," असे किरीट सोमय्या यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
नील सोमय्या २०१७ साली पहिल्यांदा मुलुंडच्या प्रभाग क्रमांक १०७मधून निवडून आले होते. ते दुसऱ्यांदा महानगरपालिका निवडणुकीला सामोरे जात आहेत. मुलुंड हा भाग भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. या भागात गुजराती, मारवाडी समाजाची लोकसंख्या मोठ्याप्रमाणावर आहे. त्यामुळे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतही मुलुंडचा बहुतांश परिसर भाजपला साथ देताना दिसला. याच पार्श्वभूमीवर मुलुंडच्या वॉर्ड क्रमांक १०७ मधील लढतीत नील सोमय्या यांचे पारडे जड मानले जात आहे.
नवी दिल्ली: राजकीय घटनांबाबत गतवर्षात बऱ्याच चांगल्या वाईट गोष्टींचा अनुभव देशाने घेतला. राज्यांनुसार म्हणायचं तर या वर्षात दिल्ली आणि बिहार या दोन ...
मुंबईत ठाकरे बंधू आणि शरद पवार गटाची युती आहे. त्यामुळे वॉर्ड क्रमांक १०७ मध्ये नील सोमय्यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने हंसराज दनानी यांना उमेदवारी दिली होती. मात्र, हंसराज दनानी यांनी उमेदवारी अर्जासोबत प्रतिज्ञापत्र न जोडल्याने निवडणूक आयोगाने त्यांचा अर्ज बाद ठरवला आहे. या वॉर्डातील प्रमुख उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने आता नील सोमय्या यांच्यासमोर फारसे आव्हान उरलेले नाही. परिणामी या वॉर्डातून नील सोमय्या यांचा विजय निश्चित मानला जात आहे. परंतु, याठिकाणी वंचित बहुजन आघाडीसह ९ अपक्ष उमेदवार अजूनही रिंगणात आहेत.